मोकाट जनावरे मरतात, मालकांना "नो टेन्शन'? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

खापरखेडा (जि.नागपूर) ः मोकाट जनावरे रस्त्यावर पडलेले प्लास्टिक खाउन पोटातील आजाराने मरतात. या जनावरांचे मालक मात्र जनावरांना मोकाट सोडून बिनधास्त असतात. मोकाट जनावरांमुळे अनेक अडचणींचा सामना सर्वसामान्य माणसाला करावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त, तर मालक मस्त अशी अवस्था झालेली आहे. 

खापरखेडा (जि.नागपूर) ः परिसरात वाटेल त्या मार्गाने अथवा गल्लीबोळातसुद्धा मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. चाऱ्याचा अभाव असल्याने जनावरे वाटेल तिथे कचऱ्यावर बिनधास्त ताब मारून निवांत रवंथ करीत बसतात. परंतु डम्पिंग यार्डमधील प्लॅस्टिकचा कचरा फस्त केल्यामुळे जनावरे मरण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र जनावरांच्या मालकांना जनावरांबाबत "नो टेन्शन' असते, असा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत

प्लॅस्टिक जनावरांसाठी कदर्नकाळ 
मोकाट फिरत असलेले गाई, बैल, कुत्रा व इतर जनावरे ही प्रशासन आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. असे असले तरी मोकाट जनावरांचे मालक बिनधास्त "नो टेन्शन' असतात. गाय दूध देत असल्यामुळे तिची निगा राखली जाते. बिनकामाची जनावरे मात्र मोकाट सोडली जातात. सर्वसामान्य नागरिकांकडून जनावरांच्या उपद्रवावर संताप व्यक्‍त होतो. मोकाट जनावरे टाकाऊ कचरा, उकिरड्यावर टाकलेल्या खराब झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांती अन्न खाऊन पोट भरत असतात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्य धोक्‍यात येत असून डम्पिंग यार्डचा प्लॅस्टिकचा कचरा जनावरांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. अनेकदा प्लॅस्टिक पोटात गेल्यामुळे जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मोकाट फिरत असलेल्या जनावरांचे मालक कोण, हे समजण्यापलीकडे असते. जनावरे बेवारस सोडली जातात. मात्र अशा जनावरांना कोंडवाड्यात ठेवणे गरजेचे झाले आहे. संबंधित मालकाची माहिती झाल्यास अशा मालकांवर कठोर कारवाई करणेही गरजेचे आहे. अनेकदा अशी जनावरे बेघर झालेली असतात. या जनावरांचा वारस कोणी नसल्याने मंगल कार्यालय अथवा ज्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम असतो अशा ठिकाणी गाय-बैल, कुत्री, डुकरे तसेच इतर मोकाट जनावरांचा हैदोस असतोच. 

नेमके काय होते पोटात ? 
बहुतांश ठिकाणांवरील कार्यक्रमात जेवणासाठी आणलेली पत्रावळ्या, द्रोण जेवण झाल्यानंतर एकत्र करून बाहेर फेकल्या जातात. अशावेळी मोकाट फिरणारी जनावरे अन्नाने भरलेल्या पत्रावळीवर तुटून पडतात. जनावरांच्या पोटात प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने पोटातील विशिष्ट भागात गोळा तयार होतो. त्यामुळे जनावरांची भूक मंदावून रोगाला निमंत्रण मिळते. त्यांचे आरोग्य धोक्‍यात येते. संबंधित विभागाने यावर प्रतिबंध घालण्याकरता उपाययोजना म्हणून कारवाई करण्याचे आदेश जाहीर करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

गाय-बैल, कुत्रा यांसारखीच अन्य जनावरांची काळजी घरच्या परिवारातील सदस्यांनी ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे पाळीव जनावरांचे आरोग्य सुदृढ राहते. जर आपण आपल्या पाळीव जनावराला मोकाट सोडले तर त्यांचे आरोग्य बाधित होऊन मृत्यूला निमंत्रण मिळते. 
रेहमान शेख 
पशुप्रेमी, खापरखेडा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animals die, owners say "no tension"?