जनावरांच्या ऑनलाइन डेटिंगचे गजब 'अॅप'; हाय गाईज... हे बुल!

प्रशांत रॉय 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

नागपूर - जगभरात सध्या ऑनलाइन डेटिंग ॲप आणि साइट्‌सची चलती आहे. लग्नाळू युवक युवतींसाठी यामुळे एक सहजसोपे ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जनावरांसाठीसुद्धा असेच एक डेटिंग ॲप विकसित झाले आहे, असे सांगितले तर निश्‍चितच आश्‍चर्याचा धक्का बसेल. पण, ब्रिटनमध्ये Tudder ॲप ची सध्या धूम असून, गाई आणि बैलांसाठी या माध्यमातून ऑनलाइन जोडीदार शोधले जात आहेत.

नागपूर - जगभरात सध्या ऑनलाइन डेटिंग ॲप आणि साइट्‌सची चलती आहे. लग्नाळू युवक युवतींसाठी यामुळे एक सहजसोपे ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जनावरांसाठीसुद्धा असेच एक डेटिंग ॲप विकसित झाले आहे, असे सांगितले तर निश्‍चितच आश्‍चर्याचा धक्का बसेल. पण, ब्रिटनमध्ये Tudder ॲप ची सध्या धूम असून, गाई आणि बैलांसाठी या माध्यमातून ऑनलाइन जोडीदार शोधले जात आहेत.

परदेशात आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर सार्वत्रिक होत आहे. शेतकऱ्यांना त्यांची आवड, गरज आणि सोईनुसार पाहिजे त्या जनावरांची निवड करण्यासाठी विपूल उपलब्धता या ॲपमुळे शक्‍य झाली आहे. शिवाय वेळ, श्रम, पैसा याचीही बचत होत आहे. ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलेल्या या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी आपल्याकडील गाई  आणि बैलांचे फोटो ॲपवर अपलोड करायचे आहेत. त्यांच्याविषयीची आवश्‍यक ती माहिती अचूकपणे द्यायची. गाईची सद्यस्थितीपर्यंतची प्रसूती किती वेळ झाली, हेसुद्धा नमूद करणे गरजेचे आहे. तसेच बैलांचीही योग्य ती माहिती भरली की, झाले प्रोफाईल तयार. यानंतर प्रजननासाठी योग्य वाटणारी गाय, बैलांची त्याच्या प्रोफाइलवर जाऊन निवड करायची. ॲपच्या नियमांचे सोपस्कार आटोपल्यानंतर निवडलेल्या गाई-बैलांना प्रजननासाठी एकत्र आणले जाते. शेतकऱ्यांना यातून भविष्यातील अधिक उत्पादनक्षम जनावरांची पैदास आपल्या पसंतीनुसार करता येत आहे.

तंत्रज्ञानाचा बदलता चेहरा
आरोग्यदायक, उत्तम शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता असणारी संततीची अपेक्षा प्रत्येक दांपत्याला असते. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक्षम, जास्त उत्पादनक्षमता असलेली जनावरांची पैदास व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. यासाठी सरकार आणि पशुवैद्यकीय विद्यापीठाद्वारे प्रयत्न होत आहेत. ॲपच्या माध्यमातून प्रजननासाठी योग्य गाय किंवा बैलाची निवड करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळत आहे. तंत्रज्ञानाचा हा बदलता चेहरा लाभदायक ठरत असून या प्रकारचे ॲप भारतीय शेतकऱ्यांसाठीही निश्‍चितच लाभदायक ठरेल, असा विश्‍वास ‘माफसु’च्या पशुप्रजनन विभागाच्या सहायक प्राध्यापक आणि तज्ज्ञ डॉ. एम. एस. बावस्कर यांनी व्यक्त केला.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: Animals online dating is a great app