मेळघाटात आणखी एक मातामृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटच्या धारणी तालुक्‍यातील पाटिया गावातील मंजू धिसूलाल मावस्कर या गर्भवती मातेचा अमरावती येथील डफरीन रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एका मातामृत्यूची नोंद मेळघाटात झाली आहे. या घटनेमुळे परत एकदा डफरीन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला.

धारणी तालुक्‍यातील पाटिया येथील गर्भवती मातेच्या अंगावर सूज असल्याने आरोग्य कर्मचारी व घरच्या लोकांनी 12 जुलै रोजी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान महिला बाथरूममध्ये गेली व तिथेच प्रसूत झाली. बाळ मात्र मृत जन्माला आले. त्यावेळी महिलेसोबत कोणताच कर्मचारी नसल्याची माहिती आहे. मृत मातेच्या ओठावर आणि डोक्‍यावर दुखापत असल्याने सदर महिला बाथरूममध्ये पडली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महिलेची प्रकृती धोकादायक असल्याने तिला 13 जुलै रोजी अमरावती येथील डफरीन रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारादरम्यान 15 जुलै रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गंभीर बाब म्हणजे डफरीन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना मातामृत्यू झाल्याची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे डफरीन रुग्णालयात किती भोंगळ कारभार सुरू आहे, हे या घटनेवरून दिसून येते.

महिलेला जेव्हा डफरीनमध्ये दाखल केले, तेव्हा तिची प्रकृती अतिशय खालावली होती. उपचारादरम्यान तिचा 15 जुलै रोजी मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
- डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: another Maternal Mortality in Melghat