पुरातन वस्तूंचे वैभव सांभाळणारे कलावैभव

स्वाती हुद्दार
शनिवार, 18 मे 2019

नागपूर : हिरव्यागार बागेने स्वागत करणारे गिरीपेठेतील सातपुतेंचे कलावैभव हे घर म्हणजे कलासक्‍तांचे घर आहे. रमेश सातपुते हे उत्तम चित्रकार आणि संगीतप्रेमी आहेत. त्यांच्याकडे साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डस असून साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे.

नागपूर : हिरव्यागार बागेने स्वागत करणारे गिरीपेठेतील सातपुतेंचे कलावैभव हे घर म्हणजे कलासक्‍तांचे घर आहे. रमेश सातपुते हे उत्तम चित्रकार आणि संगीतप्रेमी आहेत. त्यांच्याकडे साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डस असून साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे.
श्रीमंत धनवटेंची कन्या असलेल्या रमेश सातपुतेंच्या आई शकुंतला सातपुते (वय 95 वर्षे) या जे जे स्कूल ऑफ आर्टसच्या सुवर्णपदक विजेत्या असून त्यांनी 150 वर्षे जुन्या सोने, चांदी, पितळेच्या वस्तूंचा संग्रह केला आहे. त्यात सातपुतेंच्या आजोबांना इंग्रजांकडून मिळालेली तलवार, तांबे-पितळेचे पाण्याचे हंडे, अल्लादिनचा चिराग, मसाल्याचे, पानांचे डबे, विविध आकाराचे अडकित्ते, कुलपे, देवघर, फोटोफ्रेम, इस्त्री, दागिन्यांचे डबे अशा अनेक वस्तू आहेत. शकुंतला सातपुतेंनी चितारलेली सुंदर पेंटिंग्जही या संग्रहालयात आहेत.
सातपुतेंच्या भगिनी भाग्यलक्ष्मी सातपुते यांनी जगभरातील विविध धातूंच्या गणपतींचा संग्रह केला आहे. त्याशिवाय देशविदेशातील अत्तराच्या बाटल्या आणि शंखशिंपलेही त्यांच्या संग्रहात आहेत. खूप सुंदर असा भातुकलीचा खेळही त्यांनी जतन केला आहे. सातपुतेंची दुसरी बहीण पौर्णिमा काळे याही उत्तम कलावंत असून उत्कृष्ट असे भरतकाम आणि विणकाम त्या करतात. सातपुतेंनी अत्यंत परिश्रमाने जोपासलेल्या बागेत ब्रह्मकमळासारखे दुर्मीळ झाड आहे. लवंग, विलायची, तेजपानसारखी मसाल्याची झाडे आहेत. विड्याच्या पानांचे वेल आहेत. अनेक औषधी वनस्पती आहेत. मधुमेहावरील औषधी वनस्पती आहे. सातुपुते कुटुंबीय आपल्या छंदावर अपत्यवत प्रेम करतात.
पालिकेने स्वीकारावे पालकत्व
नागपुरात अशी किमान दहा खासगी संग्रहालये आहेत. तसेच जगावेगळे छंद जोपासणारे अनेक छांदिष्टही आहेत. मात्र, त्यांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही, अशी खंत सातपुतेंनी व्यक्‍त केली. या सगळ्या संग्रहांची दखल घेत नागपूर महानगरपालिकेने त्यांची देखभाल करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

Web Title: Antique items news