गोंडपिपरीचा अनुप झाला एसटीआय

संदीप रायपुरे
गुरुवार, 3 मे 2018

ग्रामीण भागात स्पर्धा परिक्षेबाबत कमालीचा क्रेझ निर्माण झाला आहे.गावागावात तुटक्याफुटक्या अभ्यासिकेच्या माध्यमातून तरूण पुर्णवेळ अभ्यास करू लागले आहेत.अशात अनुपला मिळालेल्या यशाने त्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

गोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : स्पर्धा परिक्षेत प्रचंड वाढलेल्या स्पर्धेमुळे तरूणाईपुढे नवी आव्हाने निर्माण झाली आहेत.पराकोटीची स्पर्धा जरी असली तरी आव्हानांवर मात करणारे यशश्वी होतातच. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परिक्षेत मागास व दुर्गम गोंडपिपरी तालुक्यातील अनुप भोयर या तरूणाने बाजी मारली.त्याला मिळालेल्या यशाची बातमी पोहचताच मित्रमंडळीनी फटाके फोडून गावात जल्लोष केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 251 विक्रीकर निरीक्षकाच्या पदाकरिता घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहिर करण्यात आले.यात शिवाजी बालाजी जकापुरे हा 156 गुण मिळवित राज्यातून प्रथम आला.तर राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागास व दुर्गम भागातील अनुप मुरलीधर भोयर याने 135 गुण मिळवित विक्रीकर निरीक्षकाची परिक्षा उत्तीर्ण केली.

गावचा अनुपने विक्रीकर निरीक्षकाची परिक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती पोहचताच राकेश पुन,अनील सुरकर,योगेश मुंगले झाडे यासह अनेक मित्रमंडळीनी फटाके फोडून जल्लोष मनविला.त्याचे घर गाठत आईवडिलांना पेढे भरवून अभिनंदन केले.अनुपचे वडील मुरलीधर भोयर हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत.मुलाला स्पर्धा परिक्षेत यश मिळाल्याने तेही भारावले.अनुप पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता.

ग्रामीण भागात स्पर्धा परिक्षेबाबत कमालीचा क्रेझ निर्माण झाला आहे.गावागावात तुटक्याफुटक्या अभ्यासिकेच्या माध्यमातून तरूण पुर्णवेळ अभ्यास करू लागले आहेत.अशात अनुपला मिळालेल्या यशाने त्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

Web Title: Anup Bhoyar passed STI exam