अप्पर वर्धा सिंचन मंडळातील नियुक्तीचा घोळ संपला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अमरावती : अप्पर वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी रश्‍मी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे या विभागात सुरू असलेला पात्र अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा घोळ संपुष्टात आला. रमेश ढवळे निवृत्त झाल्यानंतर या पदाचा प्रभार यवतमाळ येथील अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला होता. याच अधिकाऱ्याकडे मुख्य अभियंत्याचाही प्रभार आहे.

अप्पर वर्धा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे 31 ऑगस्टला निवृत्त झाले. त्यांच्या जागी अमरावती सिंचन मंडळातील पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने यवतमाळ येथील अधीक्षक अभियंता अनिल बहादुरे यांच्याकडे प्रभार सोपविला. त्यापूर्वी याच अधिकाऱ्याकडे अमरावती सिंचन मंडळाच्या मुख्य अभियंता या पदाचाही प्रभार देण्यात आला होता. या पदाहून रवींद्र लांडेकर निवृत्त झाल्याने त्या जागी त्यांना कारभार सोपविण्यात आला. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता अशा दोन्ही पदांसह बहादुरे यवतमाळ मंडळाच्या अधीक्षक अभियंता पदाचाही कारभार पाहू लागले. तीन पदांवर एकाच अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा प्रकार "सकाळ'ने नऊ सप्टेंबरला "अमरावती सिंचन मंडळाचा कारभार प्रभारींवर' या आशयाचे वृत्त प्रकाशित करून उजेडात आणून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन दिले होते.
शासनाने गुरुवारी (ता. 19) अप्पर वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी रश्‍मी देशमुख यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले. रश्‍मी देशमुख या मृद व जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे सेवा प्रत्यावर्तित करण्यात आल्याने नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The appointment of Upper Wardha Irrigation Board is over