कॉंग्रेसतर्फे ठाकरे व जिचकार यांची दावेदारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नागपूर - महापालिकेतील एका स्वीकृत सदस्यासाठी कॉंग्रेसतर्फे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि तानाजी वनवे गटातर्फे किशोर जिचकार यांनी दावेदारी दाखल केली. शुक्रवारी अर्जाची पडताळणी झाल्यानंतर महापालिका आयुक्त अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहे. यात कोणता गट विजयी ठरतो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपच्या चौघांनी नामांकन अर्ज दाखल केले.

नागपूर - महापालिकेतील एका स्वीकृत सदस्यासाठी कॉंग्रेसतर्फे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि तानाजी वनवे गटातर्फे किशोर जिचकार यांनी दावेदारी दाखल केली. शुक्रवारी अर्जाची पडताळणी झाल्यानंतर महापालिका आयुक्त अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहे. यात कोणता गट विजयी ठरतो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपच्या चौघांनी नामांकन अर्ज दाखल केले.

महापालिकेत स्वीकृत सदस्यपदासाठी आज नामांकन दाखल करण्यात आले. भाजपकडून सुनील अग्रवाल, मुन्ना पोकुलवार, निशांत गांधी व किशोर वानखेडे यांनी आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांच्याकडे अर्ज दाखल केले. कॉंग्रेसकडून एकच अर्ज अपेक्षित असताना दोन अर्ज आले. गेल्या तीन दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये गटनेतेपदावरून वाद सुरू आहे. तानाजी वनवे यांनी गटनेतेपदावर दावा करीत विभागीय आयुक्तांपुढे संख्याबळ त्यांच्या बाजूने असल्याचे सांगितले. मात्र, विभागीय आयुक्तांकडे संजय महाकाळकर यांची वैधरीत्या गटनेते म्हणून नोंद आहे. त्यामुळे महाकाळकर यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली, तर तानाजी वनवे यांनी किशोर जिचकार यांच्या नावाची शिफारस केली.

संख्याबळानुसार संजय महाकाळकर यांचे गटनेतेपद रद्द करण्याची मागणी विभागीय आयुक्तांना त्यांनी केली आहे. विभागीय आयुक्तांनीही मनपा आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांना नगरसेवकांना बोलावून तपासणी करण्याचे निर्देश दिले. तानाजी वनवे यांनी त्यांच्या बाजूने असल्याचा दावा करणारे रमेश पुणेकर यांनी विकास ठाकरे यांच्यासोबत असल्याचे नमूद केले. आयुक्तांनी सर्व नगरसेवकांसोबत भेट घेतली असून, केवळ पुणेकर यांची भेट ते 20 रोजी घेणार आहेत. तत्पूर्वी उद्याच नामांकन अर्जाची तपासणी करण्यात येणार आहे.

त्यामुळे विभागीय आयुक्तांसह मनपा आयुक्तांपुढेही पेच निर्माण झाला आहे. तानाजी वनवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास ठाकरेंचा महापालिका प्रवेश रोखण्यासाठी ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. परंतु, नियमानुसार विभागीय आयुक्तांकडे नोंद असलेल्या गटनेत्याच्या शिफारसीवरूनच स्वीकृत सदस्य नियुक्त केले जात असल्याने वनवे उद्या तोंडघशी पडले, तर आश्‍चर्य वाटायला नको, अशीही चर्चा आता रंगली आहे. दरम्यान, याप्रकरणात विभागीय आयुक्तही तज्ज्ञांच्या सल्ल्याची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते.

गटात आणखी एक गट
स्वीकृत सदस्यपदासाठी तानाजी वनवे यांच्या गटातही दोन गट पडल्याचे समजते. स्वीकृत सदस्यपदासाठी कुणाचे नाव द्यायचे यावरून या गटात चांगलाच खल झाला. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी अतुल कोटेचा यांच्या नावाचा, तर तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी किशोर जिचकार यांच्या नावाचा हट्ट धरला. त्यामुळे त्यांच्यातही वाद चव्हाट्यावर आले. अखेर जिचकार यांच्या नावावर एकमत झाले.
Web Title: approved corporator thackeray & jichkar by congress