विदर्भवासींना आजपासून संतविचारांची मेजवानी

शंकर टेमघरे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) - वारकरी साहित्य परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन उद्यापासून (ता. 15) गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे होत आहे. सामाजिक ऐक्‍य भावना जपणाऱ्या संत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या या संत साहित्याच्या विचारांची मेजवानी प्रथमच विदर्भवासींना चाखायला मिळणार आहे. राज्यातील संत साहित्याचे असंख्य अभ्यासक संत तुकडोजी यांच्या भूमीत दाखल झाले आहेत.

वारकरी साहित्य परिषदेने यापूर्वी नवी मुंबई, नांदेड येथे संत साहित्य संमेलने घेतली. संत विचारांची सर्व भागांमध्ये पेरणी व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येत असलेल्या या संमेलनांना मोठा प्रतिसाद मिळाला. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तीर्थक्षेत्रांमध्ये यापूर्वीची संमेलने झाली. विदर्भात हे संमेलन झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर राज्याचे न्यायराज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी नांदेड येथील संमेलनात विदर्भात अनेक संतांची मांदियाळी होऊन गेली.

त्यामुळे विदर्भात एखादे साहित्य संमेलन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार, संत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत हे संमेलन घेण्याचा निर्णय झाला. बडोले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संत विचारांची बिजे सर्व भागात रुजावी, हा उद्देश असलेल्या या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, उद्या सकाळी ग्रंथदिंडीने या संमेलनाचा प्रारंभ दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

त्यानंतर सकाळी 11 वाजता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ कीर्तनकार रामकृष्ण महाराज लहवीतकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, प्रवीण महाराज गोसावी, श्‍यामसुंदर सोन्नर, सय्यद जब्बार पटेल, तुलशीराम गुट्टे, चैतन्य महाराज कबीर, माणिक गुट्टे, अभय टिळक, बद्रीनाथ महाराज तनपुरे, दिनकर शास्त्री भुकेले, स्मिता देशमुख, झुल्की शेख, मालुश्री पाटील, नवनाथ कोळी, हरिश्‍चंद्र बोरकर, हिरामण लंजे यांच्यासह अनेक विचारवंत या संमेलनात आपले विचार मांडणार आहेत. 17 फेब्रवारी रोजी खुले अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संमेलनाची सांगता होणार असल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले.

वारकरी सांप्रदायिक पद्धतीने नियोजन
संत साहित्य संमेलन वारकरी सांप्रदायिक पद्धतीने होणार आहे. यामध्ये निवृत्तीमहाराज नामदास, निरंजन महाराज भाकरे, अमृतनाथ महाराज जोशी, चैतन्य महाराज देहूकर, एकनाथ महाराज हांडे यांची कीर्तने होणार आहेत. तसेच बापूसाहेब महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. संमेलनात उद्या रात्री साडेआठला लक्ष्मण महाराज राजगुरू यांचे, तर शुक्रवारी सकाळी दहाला चंदाताई तिवाडी यांची भारुडे होणार आहेत. दुपारी सत्यपाल महाराज, भरत रेळे यांचे सप्त खंजिरी भजन होणार आहे.

विदर्भात होणारे हे संत साहित्य ही साहित्यिक आणि वारकरी यांचा मिलाफ आहे. त्यामध्ये अनोखे नाते निर्माण झाले आहे जे असणे आवश्‍यक आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक आणि वैचारिक फलश्रुती निश्‍चित होईल.
- रामकृष्ण महाराज लहवीतकर, अध्यक्ष, संत साहित्य संमेलन

पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात संत साहित्य संमेलने झाली. मात्र, विदर्भात एकही संमेलन झाले नव्हते. त्यामुळे तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या विदर्भात संमेलन व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार, वारकरी साहित्य परिषदेने मागणी मान्य करून हे संमेलन विदर्भात आयोजित केले. ही विदर्भाला मेजवानीच आहे.
- राजकुमार बडोले, सामाजिक न्यायमंत्री

Web Title: arjuni morgaon news vidarbha news sant sahitya sammelan ramdas athawale