फुलसावंगीत भरदिवसा सशस्त्र दरोडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

फुलसावंगी (जि. यवतमाळ) - चार सशस्त्र लुटारूंनी सोमवारी (ता. 27) येथे भरदिवसा धुमाकूळ घालत एका व्यावसायिकाकडून नऊ लाखांची रोकड हिसकावून नेली, तर अन्य तीन ते चार दुकानांमध्ये तोडफोड करून व्यावसायिकांना धमकावीत दहशत पसरविली. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. यात दोन व्यावसायिक जखमी झाले आहेत. 

संदेश मुत्तेपवार, मदन पांडे (दोघेही रा. फुलसावंगी) अशी सशस्त्र हल्ल्यात जखमी झालेल्या व्यावसायिकांची नावे आहेत. सुरेश जयस्वाल व अन्य व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये लुटारूंनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. रविवारी (ता. 26) रात्रीपासूनच सशस्त्र दरोडेखोरांनी येथे दहशत पसरविली आहे. प्रवीण पेन्शनवार यांच्या घरात मध्यरात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून कपाटामधील व पॅंटमधील पाच हजार रुपयांची रोकड पळविली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मिर्झा यांनी तपास सुरू केला आहे. पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय बन्सल येथे डेरेदाखल झालेले आहेत. या घटनेने संतप्त व्यावसायिकांनी महागाव पोलिस ठाण्यावर धडक देऊन गुन्हेगारांविरुद्ध कारवाईची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. चव्हाण, जगदीश नरवाडे, सुरेश नरवाडे, डॉ. चंदन पांडे, अमर दळवे, रवी पांडे, योगेश वाजपेयी, गुलाब उबाळे आदी व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लुटारूंचा कायमचा बंदोबस्त करू, असे उपविभागीय पोलिस अधिकारी बन्सल यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: armed robbery in yavatmal dist