छिंदवाड्यातून पळालेल्या आरोपींना अटक

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः मध्य प्रदेशातील उमरानाला पोलिस ठाण्यात हत्याकांड आणि दरोड्याच्या प्रकरणात पीसीआरमध्ये असलेल्या कुख्यात सात दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला करून पळ काढला. त्या सातपैकी तीन दरोडेखोरांनी नागपुरात पळ काढला होता. त्या तीनही दरोडेखोरांना गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांचा मोठा ताफा कळमना परिसरात आला होता. गुन्हे शाखेने आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. रवी रामप्रसाद दुबे (30, रा. बेला, ता. जि. भंडारा), मोनू भुरमल ठाकर (25, रा. खेरलाई मोहल्ला, जि. मंडला, मध्य प्रदेश) आणि राजकुमार हेता केराम (23, रा. घटेरी, ता. नैनपूर, जि. मंडला, मध्य प्रदेश) अशी दरोडेखोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील उमारानाला पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम उमरिया येथे गुरुवार, 1 ऑगस्टला मोठा दरोडा पडला. शेतात असलेल्या एका फार्महाउसवर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. घटनेच्या रात्री 1 वाजता घराचा मागील दरवाजा तोडून दरोडेखोर घरात घुसले होते. घरामधील एका खोलीत भीमराव फकिरा साठे (31) व त्याचा एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी पूजा (21) हे एका खोलीत झोपले होते. दरोडेखोरांनी घरात घुसल्यानंतर त्यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर दरोडेखोर भीमराव आणि पूजा या दोघांना फरपटत शेजारच्या एका खोलीत घेऊन गेले. घरातील गोंधळ ऐकून भीमराव यांचे वडील फकिरा साठे (70) आणि आई भागाबाई साठे (65) हे झोपेतून जागे झाले. दोघेही समोरच्या खोलीत आल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांना पकडून मारहाण सुरू केली. यात विरोध करणाऱ्या फकिरा यांच्या डोक्‍यावर दरोडेखोरांनी लोखंडी रॉड मारला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोर घटनास्थळी कपाटातून रोख 70 हजार आणि जवळपास दीड लाखाचे दागिने घेऊन पसार झाले. उमारानाला पोलिसांनी यातील 8 दरोडेखोरांना
अटक केली होती. परंतु पोलिसांना चकमा देऊन हे आठही जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
मध्य प्रदेश पोलिसांना मारहाण
सातही दरोडेखोर उमारानाला पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये होते. त्यांनी लॉकअपमधून पळ काढण्याचा कट रचला. प्लॅननुसार एका पोलिस कर्मचाऱ्याला शौचासाठी बादली मागितली. कर्मचाऱ्याने बादली देण्यासाठी लॉकअप उघडले असता आरोपींनी कर्मचाऱ्याला मारहाण करून लॉकअपमधून पळ काढला होता.
नागपूर कनेक्‍शन
सातपैकी तीन दरोडेखोर सोबत पळाले. त्यांनी नागपूरच्या दिशेने पळ काढला. नागपुरात एका दरोडेखोराची बहीण राहते. त्याने बहिणीला फोन करून घरी येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते कळमन्यातील एका घरात दडून बसले. गुन्हे शाखा आणि कळमना पोलिसांनी तीनही आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, एक आरोपी जाळ्यात अडकला तर दोन पळून गेले. काही तासांतच पळून गेलेल्या दोघांनाही अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांना फोन करून माहिती देण्यात आली. दुपारपर्यंत पोलिस नागपुरात पोहचले. त्यांच्या ताब्यात तीनही आरोपींना देण्यात आले.
पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलाची चोरी
दरोडेखोरांच्या या टोळीने घंसौरच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पिस्तुलाची चोरी केली होती. या पिस्तुलाच्या धाकावर त्यांनी तीन ठिकाणी दरोडे टाकले होते. साठे यांच्याकडील दरोडा प्रकरणात अटक केल्यानंतर पोलिसांनी हे पिस्तूल जप्त केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com