भ्रष्टाचार! मागितले होते पाच लाख, मात्र अडीच लाख घेतानाच अडकले जाळ्यात! वाचा पुढे काय झाले

bribe
bribe

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे सोपविलेल्या अतिरिक्त कार्यभाराचा मोबदला म्हणून उपवनसंरक्षकाने पाच लाखांची लाच मागितली. त्यापैकी अडीच लाख रुपयांचा पहिला टप्पा स्वीकारताना त्यांना अमरावतीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

राजेंद्र गणेशराव बोंडे (वय ५७), असे लाच घेणाऱ्या विभागीय वनअधिकाऱ्याचे नाव आहे. ते व्यंकय्यापुरा येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात विभागीय वनअधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उपवनसंरक्षक (वर्ग एक) दर्जाचे ते अधिकारी आहेत. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यामुळे वनविभागाच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.

जिल्ह्यातील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे राजेंद्र बोंडे यांनी काही महिन्यांपूर्वी वरुड येथील सामाजिक वनीकरण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. त्याचा मोबादला म्हणून विभागीय वनअधिकारी बोंडे यांनी आपल्या अधिनस्थ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे पाच लाखांची लाच मागितली. एवढी मोठी रक्कम एकाच टप्प्यात देणे शक्‍य नसल्यामुळे अडीच, अडीच लाख असे दोन टप्प्यात देण्याचा त्यांच्यात व्यवहार ठरला. परंतु संबंधित वनअधिकाऱ्याने लाचेची रक्कम देण्यापूर्वी अमरावतीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

दहा सप्टेंबर रोजी व्हीनस पार्क येथील उपवनसंरक्षक बोंडे यांच्या निवासस्थानी अडीच लाख रुपये लाचेचा पहिला टप्पा स्वीकारला जाणार होता. संबंधित अधिकाऱ्याकडून ही रक्कम स्वीकारतानाच एसीबीच्या पथकाने बोंडे यांना रंगेहात पकडले.

त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गजानन पडघन, चंद्रशेखर दहेकर, माधुरी साबळे, सुनील वऱ्हाडे, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सविस्तर वाचा - रेल्वे डब्यात आढळला कुजलेला मृतदेह, आता पोलिसांसमोर हे मोठे आव्हान

निवृत्तीला अकरा महिने बाकी
वर्ग एक दर्जा प्राप्त करणाऱ्या राजेंद्र बोंडे यांना सेवानिवृत्त होण्यासाठी अकरा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. निवृत्तीच्या अंतिम टप्प्यात असताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ते अडकले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com