युवतींना गंडविणारा ठकबाज गजाआड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर: मॅट्रिमोनी साइटच्या मदतीने युवतींना जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठकबाजाला अटक करण्यात प्रतापनगर पोलिसांना यश आले आहे. उपराजधानीतील एका शिक्षिकेला फसविण्याच्या प्रयत्नात त्याचे बिंग फुटले आणि गजाआड होण्याची वेळ आली. त्याने अनेक युवतींची फसवणूक केल्याची शंका असून प्रतापनगर पोलिस तपास करीत आहेत.

सचिन भीमराव बागडे (33) असे अटकेतील ठकबाजाचे नाव आहे. तो मूळचा भंडाऱ्यातील महात्मा फुले कॉलनी येथील रहिवासी असून सध्या कुकडे ले-आउट परिसरात भाड्याने राहतो. जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जोडणाऱ्या संकेतस्थळावर त्याने खोटे प्रोफाइल तयार केले. त्यावर उच्चशिक्षित आणि डीआरडीओचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे दर्शविले. प्रोफाइलच्या मदतीने त्याने प्रतापनगर हद्दीतील शिक्षिकेवर जाळे फेकले. दोघांच्याही तीन वेळा भेटी झाल्या. यादरम्यानच तिला शंका आली. त्याची परीक्षा घेण्याचा निर्धार करीत शिक्षिकेने ऑफिस कॅन्टीनमधून एसी खरेदी करून देण्याची गळ घातली. त्यानेसुद्धा तयारी दर्शवित बुकिंगसाठी 5 हजारांची मागणी केली. शिक्षिकेने सहजतेने फोन पे ऍपद्वारे त्याला पैसे दिले. बराच कालावधी लोटूनही त्याने एसी घेऊन दिला नाही. शिवाय वेगवेगळी कारणे सांगून अतिरिक्त पैशांची मागणी करीत होता. शिक्षिकेने डिफेन्सच्या कॅन्टीनमध्ये जाऊन चौकशी केली असता आरोपीने एसी बुक केला नसून तो खोटी माहिती देत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने लागलीच पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा या प्रकरणात लक्ष घातले. केवळ मोबाईल क्रमांकाच्या आधारे प्रतापनगरचे पोलिस निरीक्षक शिंदे, अनिल ब्राह्मणकर, सचिन गेडाम यांनी आरोपीला हुडकून काढले. गुरुवारी कुकडे ले-आउट येथून त्याला अटक करण्यात आली.
पुण्याच्या युवतीला गंडा
आरोपी सचिनने 2015 मध्ये बनावट प्रोफाइलद्वारे मूळची गोंदियाची आणि पुण्यातील आयटी कंपनीत उच्चपदावर कार्यरत युवतीला फसविले होते. डीआरडीओमध्ये संशोधक असल्याचे सांगून तिच्यासोबत लग्न केले. यानंतर तिच्याकडून शक्‍य होईल तितकी रक्कम उकळली. तिच्या भावाला मुंबईत म्हाडाची सदनिका घेऊन देण्याचे आमिष दाखवून 11 लाख रुपये घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com