आंध्र प्रदेशाकडून होणार पावसाचे आगमन

file photo
file photo

अमरावती : गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाच्या आगमनची दिशा बदलण्याची चिन्हे आहेत. विदर्भात गुरुवार ते शनिवार यादरम्यान आंध्र प्रदेशाकडून पाऊस येण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी मॉन्सूनचा पाऊस पूर्वेकडून विदर्भात दाखल झाला होता.
येत्या दोन-तीन दिवसांत मॉन्सून कोकण किनारपट्टीवर सक्रिय होऊ शकतो. मॉन्सून 25 जूनपर्यंत मुंबईत पोहोचला; तरी त्या मार्गाने तो विदर्भात पोहोचण्याची शक्‍यता कमीच आहे. सद्यस्थितीत वायू वादळ गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागावर घोंघावत आहे. मॉन्सूनची अरबी समुद्रावरील शाखा थंड पडली आहे. बंगालच्या उपसागरावरील शाखेने जोर पकडलेला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमार्गे मॉन्सून विदर्भात दाखल होण्याची चिन्हे आहेत.
गुरुवार (ता. 20) व शुक्रवारी (ता. 21) विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. शनिवारी (ता. 22) संपूर्ण विदर्भात हलका, मध्यम पाऊस होईल. रविवारपासून (ता. 23) पुढील दोन दिवस मध्य भारतात काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्‍यता तसेच तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल बंड यांनी दिली.
विदर्भात मॉन्सूनचे आगमन सर्वसाधारणपणे 7 जूनला होते. मात्र गतवर्षीचा अपवाद वगळता चार-पाच वर्षांपासून पाऊस सतत हुलकावणी देत आहे. 15 ते 20 जून या कालावधीत पावसाने हजेरी लावलेली आहे. यंदा हा अवधी उलटण्याच्या मार्गावर असताना अद्याप पावसाची हजेरी नाही. पंधरवडा उलटूनही पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे. यंत्रणेचे नियोजन कोलमडण्याची स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com