अमेरिकेवर हल्ला, अरुण दातेंची मैफल अन्‌ गडकरींचा अपघात! 

नितीन नायगावकर 
सोमवार, 7 मे 2018

अनेक अविस्मरणीय मराठी भावगीते गाऊन अरुण दाते यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्यांच्या गोड आवाजाने मराठी भावगीत वेगळ्या उंचीवर गेले. माझे त्यांच्याशी वैयक्‍तिक संबंध होते. एक मोठा गायक महाराष्ट्राने गमावला आहे. 
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री 

नागपूर : काही तारखा वर्षानुवर्षे विशिष्ट घटनांच्या अनुक्रमाने लक्षात राहतात. त्यातल्या त्यात या घटनांचा आपण भाग असलो, तर आयुष्यभर त्या विस्मरणात जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व त्यांचे कुटुंबीयदेखील 9 सप्टेंबर 2001 हा दिवस कधीही विसरू शकणार नाहीत. ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या निधनामुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

नितीन गडकरी आणि अरुण दाते यांच्यात कौटुंबिक संबंध होते. याच संबंधांमुळे दातेंच्या अनेक मैफलींना गडकरी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहायचे. 9 सप्टेंबर 2001 ला रामटेकच्या शांतीनाथ सभागृहात अरुण दाते यांची मैफल आयोजित केली होती. सासरी कार्यक्रम होणार म्हटल्यावर गडकरी आवर्जून उपस्थित राहणारच. पण, अरुण दातेंनी स्वतःदेखील गडकरींना कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. सायंकाळी सातच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला. नितीन गडकरी सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपला. दरम्यान, अरुण दाते यांच्याशी काहीवेळ गप्पाही झाल्या आणि गडकरी कुटुंबीय नागपूरच्या दिशेने रवाना झाले. मनसरवरून नागपूरच्या दिशेने वळल्यावर काही अंतरावर गडकरींच्या गाडीला जोरदार अपघात झाला. या अपघातात गडकरींच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, शिवाय कुटुंबातील सर्वच सदस्य जखमी झाले होते. अगदी काही मिनिटांपूर्वी भावगीतांमध्ये रमलेल्या गडकरी कुटुंबीयांना एका भयानक अपघाताने गाठले होते.

त्याचदिवशी भारतीय वेळेनुसार सायंकाळी सातच्या सुमारास अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. जवळपास तीन हजार निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या या हल्ल्याची बातमीही कार्यक्रमादरम्यानच गडकरींना मिळाली होती. दोन्ही घटनांचा तारखेचा योग सोडला तर काहीच संबंध नाही. पण, अरुण दातेंची मैफल, अमेरिकेवरील हल्ला आणि अपघात या तीन घटनांचा दिवस एक असणे, ही बाब किमान गडकरी कुटुंबीयांना विसरता येण्यासारखी नाही.

घरी येऊन गाणे ऐकवले! 
कार्यक्रमावरून परत जाताना गडकरींचा अपघात झाल्याचे कळल्यानंतर अरुण दातेंनी आवर्जून त्यांची विचारपूस केली. पण, त्याहून वैशिष्ट्य म्हणजे ते खास गडकरींच्या भेटीसाठी नागपुरात आले आणि त्यांच्या घरी जाऊन दोन आवडती गाणी ऐकविली. "आपण कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला आणि नंतर अपघात झाला म्हणून अरुण दातेंना वाईट वाटलं. काही दिवसांनी ते आम्हा सर्वांना भेटायला घरी आले. "या जन्मावर या जगण्यावर' आणि "अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी' ही दोन गाणी त्यांनी आमच्यासाठी गायली,' अशी आठवण सांगून अरुण दाते यांच्या निधनामुळे कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य गमावला, अशा भावना कांचन गडकरी व्यक्त करतात.

अनेक अविस्मरणीय मराठी भावगीते गाऊन अरुण दाते यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्यांच्या गोड आवाजाने मराठी भावगीत वेगळ्या उंचीवर गेले. माझे त्यांच्याशी वैयक्‍तिक संबंध होते. एक मोठा गायक महाराष्ट्राने गमावला आहे. 
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री 

Web Title: Arun Date and Nitin Gadkari relation