संमेलनाध्यक्षांनी परत केले चहाचे पैसे!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा आग्रह आयोजकांकडे धरला. गेली तीन वर्षे होत असलेल्या मानधन आणि प्रवास खर्च नाकारण्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

नागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा आग्रह आयोजकांकडे धरला. गेली तीन वर्षे होत असलेल्या मानधन आणि प्रवास खर्च नाकारण्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 92 वे साहित्य संमेलन यवतमाळ येथील यजमान संस्थांना विविध कारणांनी लक्षात राहणारे आहे. उद्‌घाटकाच्या निमित्ताने निर्माण झालेला वाद आणि त्यातून झालेले आरोप-प्रत्यारोप या बाबी अधिक लक्षात राहणाऱ्या आहेत. संमेलनाच्या दोन दिवस आधीपासून सुरू झालेली आगपाखड आयोजकांना कायमस्वरूपी झेलावी लागणार, हे निश्‍चित असले तरी यात सुखद अनुभव देणारी एक घटना घडली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आटोपल्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन सोहळा होता. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते. प्रकट मुलाखतीनंतर अरुणा ढेरे यांना अनेक चाहते व रसिक भेटले. या गर्दीत 92 व्या संमेलनाच्या आयोजन समितीचे कार्यवाह डॉ. विवेक विश्‍वरूपे हेही होते.
डॉ. ढेरे यांनी विश्‍वरूपेंना हॉटेलमधील चहाचे बिल किती झाले, असा प्रश्‍न केला. विश्‍वरूपेंना क्षणभर काहीच कळले नाही. डॉ. ढेरे नेमके कशाबद्दल बोलत आहेत, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. यवतमाळला चार दिवस मुक्कामी असताना अरुणा ढेरे यांना अनेक लोक हॉटेलवर भेटायला आले. यात त्यांच्या मित्र-मैत्रिणींसह चाहत्यांचीही संख्या बरीच होती. या भेट देणाऱ्यांच्या चहा-बिस्किटाचा खर्च हॉटेलचे लोक वेगळा देतील, असे डॉ. ढेरे यांना वाटले. पण, हॉटेल सोडताना त्यांनी असे काही बिल दिले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे विचारणा केली असता ते पैसे आयोजक देतील, तुम्ही आमच्या पाहुण्या आहात, असे हॉटेल व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले. तिथे आग्रह करून उपयोग झाला नाही, म्हणून डॉ. ढेरे यांनी साहित्य संघाच्या कार्यक्रमात डॉ. विश्‍वरूपे यांना किती पैसे झाले, अशी विचारणा केली. मात्र, त्यांनीदेखील पैसे घेण्यास नकार दिला. संमेलनाध्यक्षांनी खूप जास्त आग्रह केल्यानंतर त्यांचा मान राखायचा म्हणून डॉ. विश्‍वरूपे यांनी आयोजकांतर्फे 100 रुपये स्वीकारले आणि त्याची संमेलनाच्या जमाखर्चात नोंद केली. प्रश्‍न शंभर रुपयांचा नसून आयोजकांना सहकार्य करण्याच्या मानसिकतेचा आहे आणि आम्ही या मानसिकतेचा आदर केला, असे डॉ. विश्‍वरूपे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: aruna dhere news