अरुंधती घेणार बॅडमिंटनपटूंचा "क्‍लास' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे कोराडी येथील तायवाडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात एक महिन्याचे विशेष बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर घेणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक प्रतिभावान खेळाडू मिळतील, अशी आशा अरुंधतीने व्यक्‍त केली. 

नागपूर - नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे कोराडी येथील तायवाडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात एक महिन्याचे विशेष बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर घेणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक प्रतिभावान खेळाडू मिळतील, अशी आशा अरुंधतीने व्यक्‍त केली. 

अरुंधती म्हणाली, शहरी भागांतील बॅडमिंटनपटूंना दर्जेदार सोयीसुविधा मिळतात. त्या तुलनेत ग्रामीण भागातील खेळाडू दुर्लक्षित असतात. अशा खेळाडूंना प्रशिक्षण देऊन खेळासाठी "मोटिव्हेट' करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच गोपीचंद अकादमीत आतापर्यंत जे काही शिकले, त्याचा फायदा नागपूरच्या युवा खेळाडूंना व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिबिर येत्या 1 मे ते 3 जून या कालावधीत तायवाडे महाविद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इनडोअर सभागृहातील बॅडमिंटन कोर्टवर होईल. शिबिरादरम्यान अरुंधती पूर्ण वेळ उपलब्ध राहणार असून, या उपक्रमात तिचे पती आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक अरुण विष्णू, चेतक खेडीकर, अविनाश पानतावणे, डॉ. संजय चौधरी, संजय कडुस्कर, अभिलाषा पानतावणे हेही सहकार्य करणार आहेत. शिबिराचे शुल्क किमान तीन हजार रुपये राहणार असून, सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी खुले आहे. पत्रकार परिषदेला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, अविनाश पानतावणे व डॉ. शरद सूर्यवंशी उपस्थित होते. 

भविष्यात नागपुरात बॅडमिंटन अकादमी 
अरुंधतीने भविष्यात नागपुरात बॅडमिंटन अकादमी सुरू करण्याचा मनोदय यावेळी बोलून दाखविला. मला नागपूरने खूप काही दिले आहे. त्यामुळे माझेही काही देणे लागते. रिटायर्ड झाल्यावर निश्‍चितच एखादी अकादमी स्थापन करून खेळाडू तयार करण्याचा विचार माझ्या मनात आहे. पण, सध्यातरी माझा संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय स्पर्धांवरच आहे. 

राष्ट्रीय स्पर्धेचा खेळाडूंना फायदा 
येत्या नोव्हेंबरमध्ये नागपुरात होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचा येथील खेळाडूंना खूप फायदा होणार असल्याचे अरुंधतीने सांगितले. ती म्हणाली, नागपुरात एवढी मोठी स्पर्धा होणे निश्‍चितच गौरवाची बाब आहे. स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातील दर्जेदार दिग्गज खेळाडू शहरात येणार असून, नागपूरकरांना त्यांना खेळ जवळून पाहण्याची व शिकण्याची संधी मिळणार आहे. 

Web Title: Arundhati Pantawane