आरोग्य यंत्रणेत आशांचे आर्थिक शोषण

File photo
File photo

अमरावती : आरोग्य यंत्रणा व समाजाशी जोडणारा दुवा असलेल्या आशा वर्करचे शासकीय यंत्रणेत आर्थिक शोषण होत आहे. त्यांना कामाच्या तुलनेत मिळणारा मोबदला अतिशय अल्प आहे. 65 प्रकारच्या कामांसाठी मिळणारा मोबदला अल्प असल्याने त्यांना अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन देण्यात यावे, ही मागणी मात्र सरकार कानावर घेत नाही. त्यामुळेच त्यांच्यात अन्यायाची भावना आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात 60 हजार 691 आशा वर्कर कार्यरत आहेत. आरोग्यसेवेपासून मैलोगणती दूर असलेल्या कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी झगडणाऱ्या आशा सेविकांवर स्वतःसाठी आरोग्यसुविधा व किमान वेतनासाठी लढण्याची वेळ आली. राज्यात दरवर्षी 13 हजारांहून अधिक बालमृत्यू होत असताना तब्बल 31 हजार कमी वजनाच्या आणि आठ हजार अतिजोखमीच्या बालकांचे निदान करून उपचारासाठी रुग्णालयात आणणाऱ्या आशांची भूमिका महत्त्वाची आहे. शेजारच्या तेलंगणात सहा हजार व केरळमध्ये साडेसात हजार रुपये दरमहा वेतन दिले जात असताना महाराष्ट्रात मात्र तीन हजार रुपये दिले जातात.
याशिवाय गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूती, बाळांचे लसीकरण, पूरक व पोषण आहाराच्या नोंदी, गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण, हिवताप, क्षयरोग रुग्णांच्या औषधांचा पाठपुरावा, पल्स पोलिओ, साथीच्या आजारांवर नियंत्रण अशी तब्बल 65 कामे आशा करतात.
असा मिळतो मोबदला
कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहित केल्यास 150 रुपये; हिवताप चाचणीसाठी रक्ताचा नमुना घेतल्यास 15 रुपये; कुष्ठरुग्णाने नऊ महिने औषधोपचार पूर्ण केल्यास 400 रुपये; जन्मापासून एक वर्षापर्यंत बालकाचे लसीकरण पूर्ण केल्यास 100 रुपये; लसीकरणास पात्र बालकांची यादी दरमहा दिल्यास 100 रुपये; पल्स पोलिओत सहभाग दिल्यास 75 रुपये; गर्भनिरोधक साधने, सॅनिटरी नॅपकिन वितरित केल्यास प्रत्येकी एक रुपया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com