आशीष देशमुख म्हणाले, आघाडीच्या पराभूत उमेदवारांचा करणार सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पराभूत झालेल्यांचा उत्साह व आत्मविश्‍वास कायम ठेवण्यासाठी तीन नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता त्रिमूर्ती नगरातील अनसूया मंगल कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. माजी आमदार व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणारे आशीष देशमुख यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. 

नागपूर : उण्यापुऱ्या दहा ते बारा दिवसांत सत्ताधारी भाजपसोबत शर्थीचा लढा देऊन कॉंग्रेसच्या मताधिक्‍यात वाढ करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील पराभूत उमेदवारांचा सत्कार येत्या तीन नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. माजी आमदार व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणारे आशीष देशमुख यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. 
आशीष देशमुख म्हणाले, कॉंग्रेसचा सर्वसमावेशक हा देशातील सर्वांत जुना विचार आहे. विदर्भात यापूर्वी कॉंग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. मात्र, काही वर्षांत कॉंग्रेस विखुरलेली आणि सैरभैर झाल्याने विदर्भात भाजपने मुसंडी मारली. मात्र, यावेळी निवडणुकीत कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाजपसमोर आव्हान उभे केले. त्याचा असर संपूर्ण विदर्भात दिसला. भाजपला रोखण्यात चांगलेच यश आले. अनेक उमेदवार थोडक्‍या मतांनी पराभूत झाले. आघाडीचे मताधिक्‍य वाढले आहे. बऱ्याच उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात लढून त्यांचे मताधिक्‍य घटविले आहे. प्रचाराला कमी वेळ मिळाला, अन्यथा मुसंडी मारता आली असती, असे त्यांनी सांगितले. 
पराभूत झालेल्यांचा उत्साह व आत्मविश्‍वास कायम ठेवण्यासाठी तीन नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता त्रिमूर्ती नगरातील अनसूया मंगल कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव उपस्थित होते. 
झेडपीत कॉंग्रेसचा झेंडा 
सुनील केंदार यांच्या मताधिक्‍यात झालेली वाढ आणि उमरेड मतदारसंघात कॉंग्रेसची वापसी हे शुभसंकेत आहेत. कामठीतही कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली असल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा अध्यक्ष होईल, यात शंका नसल्याचे आशीष देशमुख म्हणाले. 
पराभूतांना मिळावी पुढची संधी 
विधानसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवार बऱ्याच कमी मतफरकाने पराभूत झालेत. उमेदवारी एका महिन्यापूर्वीच घोषित झाली असती तर चित्र वेगळे असते. त्यामुळे पुढल्या निवडणुकांसाठी याच उमेदवारांना संधी मिळावी, असा आग्रह पक्षाकडे करणार असल्याचे आशीष देशमुख म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Deshmukh said, 'We will honor the leading candidates