आशीष जयस्वाल बंडखोरीच्या पवित्र्यात?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : भाजप रामटेक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याच्या तयारीत नसल्याने शिवसेनेचे माजी आमदार तसेच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष ऍड. आशीष जयस्वाल बंडखोरीच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन तसेच जनतेच्या भावनांचा विचार करून याबाबत दोन ऑक्‍टोबरला भूमिका जाहीर करून, असे त्यांनी सांगितले. 

जयस्वाल यांनी शिवसेनेला तीनवेळा रामटेक जिंकून दिले आहे. मागील निवडणुकीत युती तुटल्यामुळे त्यांचा पराभव झाला. भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांना पराभूत केले. ते भाजपात जाणार अशा वावड्या पाच वर्षांपासून उठत होत्या. युती झाल्यास रामटेक शिवसेनेसाठी सोडण्यात येईल, अशी आशाही त्यांना होती. मात्र, जिंकलेल्या जागा भाजप सोडण्याच्या तयारीत नाही. हे जवळपास आता स्पष्ट झाले आहे. जयस्वाल भाजपचे उमेदवार असतील असेही बोलले जात होते. मात्र, यापैकी काहीच होण्याची शक्‍यता दिसत नसल्याने जयस्वाल अस्वस्थ झाले आहेत. 
यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता जयस्वाल म्हणाले, रामटेकवर पहिला दावा शिवसेनेचाच आहे. तीनवेळा हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला आहे. एका विजयामुळे भाजप दावा करीत असेल तर ते अयोग्य आहे. पंचवीस वर्षांपासून आपण येथे कार्य करीत आहोत. पक्षाचा प्रत्येक निर्णय शिरसावंद्य मानला. पण, राजकारणात निवडणुकीपासून दूर राहू शकत नाही. मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आपण लढावे असा त्यांचा आग्रह आहे. अजूनही आपणास ही जागा शिवसेनेसाठी सोडल्या जाईल, असा विश्‍वास आहे. नाही सोडली तर सर्व शिवसैनिकांची मते जाणून घेऊन दोन ऑक्‍टोबरला आपण आपला निर्णय जाहीर करू, असे आशीष जयस्वाल यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Jaiswal