...तर कॉंग्रेसला परिणाम भोगावे लागतील - सोनोने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

अकोला - महाराष्ट्रातील 12 लोकसभेच्या जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचा प्रस्ताव आम्ही जून महिन्यातच कॉंग्रेसला दिला आहे. मात्र, केवळ अकोल्याची जागा आम्हाला सोडण्याची प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या पसरवून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस टोलवाटोलवी करीत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ओबीसी, धनगर, मुस्लीम, माळीसह इतरही समाजघटकांची भक्कम ताकद प्रकाश आंबेडकर यांच्या मागे उभी राहत आहे. त्यांना कमी लेखाल तर त्यांचे परिणाम कॉंग्रेसला 2019 मध्ये भोगावे लागतील, असा हल्लाबोल भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत बैठक सुरू आहे. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडण्याची दोन्ही कॉंग्रेसची तयारी आहे. या संदर्भात अशोक सोनोने यांना विचारले असता ते म्हणाले, की कॉंग्रेसकडून केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जाते. त्यांना आघाडीसंदर्भात बोलणी करायची असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्याशी समोरासमोर बोलणी करणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेसनी आम्हाला 12 जागा द्यावात, अन्यथा राज्यातील 48 लोकसभेच्या जागा आम्ही सक्षमपणे लढविणार असल्याचे सोनोने म्हणाले.

Web Title: Ashok Sonone Talking to Congress Politics