वऱ्हाडातील आश्रमशाळांची सुरक्षा वाऱ्यावर

याेगेश फरपट
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

* सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने विद्यार्थी घरी गेले आहेत. तर शिक्षक सुध्दा कुणी थांबलेले नसतील. सुरक्षागार्ड मात्र याठिकाणी तैनात आहेत.

- एस.जी.सुतार (सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय अकाेला) 

अकाेला - ‘यावे ज्ञानासाठी अन जावे ​सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य डाेळ्यासमाेर ठेवून शासनामार्फत आदिवासी बहुल वस्त्यांमध्ये आश्रमशाळा सुरु करण्यात आल्यात. निधीचा विनियाेग याेग्यरित्या हाेत नसल्याने आश्रमशाळांची दयनीय अवस्था झाली आहे. ‘सकाळ’च्या चमूने शुक्रवारी (ता.४) वऱ्हाडातील काही आश्रमशाळांना भेट दिली असता विविध साधनांचा अभाव तर सुरक्षेचे धिंडवडे उडाले असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले. 

एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ८ शासकीय तर २० अनुदानित आदिवासी आश्रमशाळा अकाेला, बुलडाणा व वाशीम या तीन जिल्ह्यात चालविल्या जातात. शासकीय आश्रमशाळेची जबाबदारी मुख्याध्यापकावर तर अनूदानीत आदिवासी आश्रमशाळेचे व्यवस्थापन संबधीत संस्थेचे संचालक मंडळावर आहे. याठिकाणी सुध्दा मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षकासह इतर पदे असतात. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध प्रकारच्या राबविण्यासाेबत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास कसा हाेईल यादृष्टीने ही यंत्रणा उपाययाेजना राबवते. अनूदानीत आश्रमशाळांना यासाठी काेट्यावधी रुपयांचा निधी वितरीत केला जाताे. तर शासकीय आश्रमशाळांना बांधकाम व्यतिरिक्त दुरूस्ती व देखभालीसाठी, साहित्य खरेदीसाठी निधी दिला जाताे. असे असतानाही वऱ्हाडातील आश्रमशाळामध्ये सुविधांचा अभाव कायम आहे. यामुळे पैसा मिळूनही सुविधापासून विद्यार्थी सुविधापासून वंचीत राहत आहेत. बार्शिटाकळी तालुक्यातील काेथळी बू. येथील शासकीय आश्रमशाळेत निकामी शौचालये, पिण्यासाठी थातूरमातूर व्यवस्था दिसून आली. ईलेक्ट्रींग फिटींगही उखडलेली आढळून आली. एवढेच नाहीतर लाखाे रूपयांची मालमत्ता असलेल्या या आश्रमशाळेचे प्रवेशद्वारही उघडेच दिसले. आतमध्ये गुरे चरत हाेती. एकही कर्मचारी याठिकाणी आढळून आला नाही. त्यामुळे गुराखी ईकडे तिकडे फिरतांना दिसून आले. त्यामुळे या आश्रमशाळेची सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आहे यावरुन स्पष्टपणे जाणवले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शासनाचा उद्देश सफल हाेत नसून विद्यार्थ्यांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

आश्रमशाळेची सुरक्षा वाऱ्यावर 
जंगल क्षेत्रात ही आश्रमशाळा असतानाही याठिकाणी काेणत्याही प्रकारची सुरक्षा तर नाहीच. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावण्यात आले नाहीत. याठिकाणी मुलींचे वसतीगृह आहे. असे असतानांही काेणतीही सुरक्षा नसणे हा प्रकार गंभीर असल्याचे प्रकर्षाने जाणवले. 

क्रिडांगणही नावालाच 
निवासी विद्यार्थ्यांच्या मनाेरंजनासाठी टिव्ही, वृत्तपत्रे, विविध प्रकारची पुस्तके असावीत. शिवाय प्रशस्त मैदान खेळण्यासाठी असावे. याठिकाणी मुबलक खेळाची साधने असावीत असा शासननिर्णय सांगताे. पण याठिकाणी व्हाॅलीबॉल खेळण्यासाठी असलेली जाळी खिळखिळी व फाटलेली दिसून आली. 

नळांच्या ताेट्या गायब 
विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी वॉटर कुलर लावण्यात आले आहेत. मात्र त्यांच्याही केबल तुटलेल्या दिसल्या. तर बाथरूम व शौचालयातील पाईप फुटलेले व नळांना ताेट्या गायब दिसल्या. याठिकाणी बांधण्यात अालेला हौद उघडाच हाेता. त्यामुळे उघडे पाणीच विद्यार्थी वापरत असावे असा निष्कर्ष निघताे. 

वर्गखाेलीच्या खिडक्याही तुटलेल्याच 
मुलींच्या वसतीगृहासमाेरील वर्गखाेल्यांच्या खिडक्याही तुटलेल्या तर काचा फुटलेल्या स्थीतीत आढळल्या. दिवाळीच्या सुट्यानंतर शाळा सुरू हाेणार आहे. कडाक्याची थंडी सुरू झाली असल्याने खिडक्या अशाच राहिल्यात तर विद्यार्थ्यांचे आराेग्य बिघडण्याची शक्यता आहेे.

Web Title: Ashram school security dangerous in Akola