भाजपला फटाके, कॉंग्रेसची दिवाळी!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

नागपूर : मागील निवडणुकीत विजयाचा षट्‌कार खेचणाऱ्या भाजपला यंदा चौकारावरच समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड मताधिक्‍याने निवडून आले असले तरी त्यांना आपले दोन सहकारी गमवावे लागले. दुसरीकडे मध्य नागपूरमधून भाजपचे विकास कुंभारे तर दक्षिणचे उमेदवार मोहन मते धावबाद होताहोता थोडक्‍यात बचावले. जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाला. जिल्हाध्यक्षांसह भाजपचे तब्बल चार उमेदवार पराभूत झालेत. यात दोन आमदारांचाही समावेश आहे. पालकमंत्र्यांना तिकीट नाकारल्याने ओबीसी समाजाची नाराजी भाजपला भोवल्याचे स्पष्ट दिसून येते. 

नागपूर : मागील निवडणुकीत विजयाचा षट्‌कार खेचणाऱ्या भाजपला यंदा चौकारावरच समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड मताधिक्‍याने निवडून आले असले तरी त्यांना आपले दोन सहकारी गमवावे लागले. दुसरीकडे मध्य नागपूरमधून भाजपचे विकास कुंभारे तर दक्षिणचे उमेदवार मोहन मते धावबाद होताहोता थोडक्‍यात बचावले. जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाला. जिल्हाध्यक्षांसह भाजपचे तब्बल चार उमेदवार पराभूत झालेत. यात दोन आमदारांचाही समावेश आहे. पालकमंत्र्यांना तिकीट नाकारल्याने ओबीसी समाजाची नाराजी भाजपला भोवल्याचे स्पष्ट दिसून येते. 
मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचा जिल्हा असल्याने येथून भाजपला मोठ्या आशा होत्या. मात्र, येथेच सर्वाधिक फटका सत्ताधाऱ्यांना बसला. बारा मतदारसंघांपैकी भाजपचे सहा उमेदवारांना पराभवाचे तोंड बघावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे पन्नास हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आले. त्यांनी माजी आमदार कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांना पराभूत केले. 
सर्वाधिक चुरशीची लढत दक्षिण नागपूरमध्ये झाली. येथील आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे कोहळे समर्थक नाराज होते. याशिवाय शिवसेना व भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरी केली होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे गिरीश पांडव यांनाही प्रमोद मानमोडे यांच्यामुळे बंडखोरीचा सामना करावा लागला. शेवटच्या फेरीपर्यंत येथे घमासान सुरू होते. मोहन मते अवघ्या सुमारे चार हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आले. पूर्व नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली. ते सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, कॉंग्रेसच्या पुरुषोत्तम हजारे यांनी खोपडे यांना जास्त वरचढ होऊ दिले नाही. ते फक्त 24 हजारांच्या फरकाने जिंकून आले. मध्य नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या बंटी शेळके यांनी सुरुवातीला आघाडी घेऊन चांगलीच रंगत आणली होती. मात्र, विकास कुंभारे यांना नशिबाने साथ दिली. मुस्लिमांची काही मते एमआयएमकडे वळल्याने कुंभारे यांना दिलासा मिळाला. कुंभारे अवघ्या पावणेचार हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आले. उत्तरच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, बसपचा हत्ती फारसा चालला नाही. त्यामुळे माजी मंत्री व कॉंग्रेसचे उमेदवार नितीन राऊत निवडून आले. भाजपचे उमेदवार मिलिंद माने यांना पराभवाचा धक्का बसला. 
पश्‍चिमेत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे अखेर विजयी झाले. ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती. त्यांनी राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त असलेले भाजपचे उमेदवार आमदार सुधाकर देशमुख यांना पराभूत केले. 
ग्रामीणमध्ये भाजप पुन्हा बॅकफूटवर 
ग्रामीण भागातील सहापैकी फक्त दोनच जागा भाजपला राखता आल्या. येथील पाच मतदारसंघात यापूर्वी भाजपचे आमदार होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याने ओबीसी समाजाचा फटका येथे भाजपला बसल्याचे जाणवते. 
सावनेरमध्ये कुठल्याही परिस्थिती कॉंग्रेसचे उमेदवार आमदार सुनील केदार यांना पराभूत करण्याचा चंग भाजपने बांधला होता. याकरिता जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना मैदानात उतरवले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना प्रचाराला आणले. मात्र, त्याचा काहीएक फायदा झाला नाही. केदार पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्‍याने निवडून आले. 
कामठीत पालकमंत्र्यांचे समर्थक टेकचंद सावरकर यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, त्यांना सहजासहजी विजयी होता आले नाही. कॉंग्रेसच्या सुरेश भोयर यांनी त्यांना शेवटच्या फेरीपर्यंत झुंजवले. 
उमरेड मतदारसंघात दोनवेळा निवडून आलेल्या सुधीर पारवे यांना त्यांचे चुलतबंधू कॉंग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांनी पराभवाची धूळ चारली. काटोलमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांना मोठ्या मताधिक्‍याने त्यांनी पराभूत केले. 
रामटेकमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशीष जयस्वाल पुन्हा निवडून आले आहे. त्यांनी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना पराभूत करून आपला हिशेब चुकता केला. कॉंग्रेसचे उमेदवार उदयसिंग यादव तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. 
हिंगण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांना आयात करून मोठी गाजावाजा केला होता. जातीय समीकरणे मांडली. मात्र, भाजपचे उमेदवार आमदार समीर मेघे यांनी त्यांचा आरामात पराभव केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assembly election 2019 result