मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली नाही?

मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली नाही?

नागपूर : मुस्लिम समाजाला एकही जागा दिली नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी उमेदवार सर्व नेत्यांच्या सहमतीने निवडण्यात आल्याचे सांगून गांधी यांनी उमेदवारांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले. 
वणी आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभांसाठी ते नागपूरला आले होते. तत्पूर्वी त्यांनी जिल्ह्यातील बारा उमेदवार आणि काही पदाधिकाऱ्यांसोबत विमानतळावर चर्चा केली. सर्वांच्या सहमतीने उमेदवार निवडण्यात आले आहे. जो पक्षाने निर्णय घेतला त्याचे स्वागत करून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा सल्लाही त्यांनी नाराजांना दिला. सुमारे दीड वाजताच्या सुमारात ते विमानतळावर पोचले. येथून हेलिकॉप्टरने ते सभास्थळी रवाना झाले. यावेळी प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद उपस्थित होते. उमेदवार व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी सुमारे दहा मिनिटे चर्चा केली. 
सुरुवातीलाच माजी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख हुसेन यांनी मुस्लिम समाजाला नागपूर जिल्ह्यात प्रतिनिधित्व दिले नसल्याचे सांगून नाराजी दर्शवली. मध्य आणि पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची लोकसंख्या निर्णायक आहे. यापूर्वी मध्य नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचा उमेदवार तीन वेळा निवडून आला आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. बेदखल केल्याने मुस्लिम समाजात नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनी महिलांना प्रतिनिधित्व दिले नसल्याचे सांगितले. दक्षिण-पश्‍चिमचे कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार आशीष देशमुख यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारसभा घेण्याची विनंती केली. 
शेळके यांना रोखले 
मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांना राहुल गांधी यांना भेटण्यापासून पोलिसांनी रोखले होते. त्यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी असल्याने भेटणाऱ्यांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. मात्र, मल्लिकार्जुन खरगे यांनी मध्यस्थी केल्याने त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट होऊ शकली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com