विधानसभा निवडणूक : बसप लढविणार 288 जागा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

यवतमाळ : बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र विधिमंडळाच्या 288 जागांवर उमेदवार देणार आहे. त्यासाठी विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती नागपूर येथे उद्या, ता. 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे, अशी माहिती बसपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर यांनी दिली.

यवतमाळ : बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र विधिमंडळाच्या 288 जागांवर उमेदवार देणार आहे. त्यासाठी विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती नागपूर येथे उद्या, ता. 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे, अशी माहिती बसपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत बसपची समाजवादी पक्षासोबत युती होती. परंतु, लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणूक पक्ष स्व:बळावर लढणार आहे. विदर्भातील 62 जागांवर उमेदवार देण्यासाठी ता. 12, 13 व 14 सप्टेंबर रोजी नागपूर येथे बहुजन समाज पक्षाच्या विभागीय कार्यालयात मुलाखती घेण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी रामअचल राजभर, खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश सारखे, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, कोषाध्यक्ष दयानंद किरतकर मुलाखती घेणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुकांच्याही मुलाखती नागपूर येथेच होणार असून इच्छुकांनी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

यवतमाळसाठी तिघांची नावे चर्चेत
2014 च्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, यावेळी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे इच्छुकांची गर्दी ओसरली. तरीदेखील स्व:पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास बसपच्या "हत्ती'वर स्वारी करण्याची काहींची तयारी आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमधील प्रत्येकी एका तरुण नेत्याचा समावेश आहे. वेळेवर ठरणाऱ्या समीकरणावर बसप निर्णय घेणार असल्याचे बसपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assembly Elections: BSP to contest 288 seats