फॉरवर्ड ब्लॉक विधानसभा लढणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : भाजपने राज्यात किती जागा जिंकणार, हे आधीच जाहीर केले आहे, विरोधी पक्षनेता कुठल्या पक्षाचा हेसुद्धा सांगितले आहे? हे कशाच्या भरोशावर बोलत आहेत, याची सर्वांनाच जाणीव असली तरी विरोधक जिवंत राहावा यासाठी महाराष्ट्रात पंधरा ते वीस जागा आम्ही लढणार असल्याचे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी सांगितले. 

नागपूर : भाजपने राज्यात किती जागा जिंकणार, हे आधीच जाहीर केले आहे, विरोधी पक्षनेता कुठल्या पक्षाचा हेसुद्धा सांगितले आहे? हे कशाच्या भरोशावर बोलत आहेत, याची सर्वांनाच जाणीव असली तरी विरोधक जिवंत राहावा यासाठी महाराष्ट्रात पंधरा ते वीस जागा आम्ही लढणार असल्याचे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी सांगितले. 
तराळ यांनी गुरुवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. निवडणूक लढण्यामागची भूमिकाही स्पष्ट केली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी लोकसभेत आम्ही तीनशेपेक्षा अधिक जागा जिंकू असे जाहीर केले होते. पाच वर्षांत कुठलीच चांगली कामे केली नसल्याने त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह कुठल्याच भाजपच्या नेत्यालाही यावर विश्‍वास बसत नव्हता. देशभर असंतोष खदखदत होता. तत्पूर्वी, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश ही राज्येही भाजपने गमावली होती. मात्र, निकाल लागला तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. अमित शहा यांचे भाकीत खरे ठरले. भाजपने तीनशेचा आकडा पार केला. त्यामुळे ईव्हीएमवरची शंका आणखीच वाढली आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राजकीय पक्षांनी ईव्हीएमला विरोध दर्शवला आहे. पुन्हा बॅलेट पेपवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्याची आयोगाने दखल घेणे भाग असल्याचेही यावेळी तराळ यांनी सांगितले. 
दिनेश तराळ विदर्भ निर्माण महामंचचे यापूर्वी मुख्य संयोजक होते. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतही ते सक्रिय होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून 80मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली आहे. दरम्यान, पीकविमा योजनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत त्यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा कोणत्या कंपनीने काढला याची माहिती झाली पाहिजे, विमा काढण्यासाठी प्रत्येक गावात कंपन्यांनी एजंट नेमावे अशी त्यांनी न्यायालयात मागणी केली आहे. यामुळे त्यांचा फॉरवर्ड ब्लॉकच्या नेत्यांशी संबंध आहे. विद्यमान सरकार राष्ट्रवादाची भाषा बदलवायला निघाले असल्याने आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले. 
फॉरवर्ड ब्लॉक किती जागा जिंकेल, राजकीय ताकद किती आहे हा आमच्यासाठी मुद्दा नाही. आम्हाला लढा द्यायचा आहे. लोकशाहीत विरोधक कायम ठेवायचा आहे. आमची मते मांडायची आहेत. यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे श्रीकांत तराळ यांनी सांगितले. यावेळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे विचारमंचचे अध्यक्ष सुनील चोखारे उपस्थित होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assembly to fight forward block