अटाळी गाव, तेथे नाही अफवांना वाव !

श्रीधर ढगे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

खामगाव (जि. बुलडाणा) - मनोरुग्ण भिक्षुकी, बहुरूपी, भटके यांना मारहाण केल्याच्या, ठार मारल्याचा अप्रिय घटना अनेकदा राज्यात घडल्या आहेत, असे भयावह काही आपल्या गावात घडू नये यासाठी अटाळीच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. गावात येणाऱ्या लोकांची ग्रामपंचायतीमध्ये नोंद घेण्यासोबतच ‘व्हॉट्‌सॲप’ समूहाच्या माध्यमातून दक्षता बाळगली जाते. हा उपक्रम राज्यात एक नवीन आदर्श पायंडा म्हणून समोर आला आहे. 

जळगाव जामोद तालुक्‍यातील मोहिदेपूर गावच्या नाथजोगी समाजातील नागरिकांची चोर समजून नागपूर येथे २०११ मध्ये जमावाकडून हत्या झाली होती. ही मन सुन्न करणारी घटना आजही अंगाचा थरकाप उडवीत असते. अटाळीतही संशयामुळे अपरिचित व्यक्तीला घेरण्यासारखे प्रकार घडले होते. आता गावात मोठी अनुचित घटना घडू नये, याकरिता गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. पोलिस पाटील शकील देशमुख यांच्या संकल्पनेतून दक्षतेचा अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे. त्यासाठी ‘व्हॉट्‌सॲप’चा सकारात्मक वापर करून घेण्यात आला असून, समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवा दूर करण्याची जबाबदारी ग्रुप ॲडमिनला देण्यात आली आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक अपरिचित व्यक्तीची वहीत नोंद घेण्याची मोहीमही सुरू करण्यात आली. त्यामध्ये संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती घेण्यात येते. गावातील सर्व नागरिकांना ‘व्हॉट्‌सॲप’वर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती टाकली जाते. त्यामुळे संशयास्पद अनोळखी व्यक्ती जमावाचा बळी होण्यासारख्या घटनांना आळा बसला. देशमुख यांच्यासह आठ जणांचा चमू ही मोहीम गावात राबवित आहेत.

अफवांचे बळी 
    २०११ मध्ये जळगाव जामोद तालुक्‍यातील (जि. बुलडाणा) तीन बहुरूप्यांची जमावाकडून नागपूर जिल्ह्यात हत्या 
    १ जुलै २०१८ - राईनपाड्यात (जि. धुळे) जमावाकडून पाच जणांची अमानुष हत्या 
    ८ जून २०१८ -  वैजापुरात (जि. औरंगाबाद) चोर समजून फासेपारधी लोकांवर हल्ला 
    ११ जून २०१८ - गोरेगावमध्ये (जि. गोंदिया) किडनीचोर म्हणून एका मनोरुग्णाची हत्या झाली होती

अटाळीतील गावकऱ्यांचा ‘जमजम’ या नावाने व्हॉट्‌सॲप समूह तयार करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतले. गावात येणाऱ्या प्रत्येक अपरिचित व्यक्तीची ‘व्हिजिट बुक’मध्ये नोंद घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. असा उपक्रम प्रत्येक गावाने राबविल्यास प्रशासनास त्याचे सहकार्य होईल. सोबतच अफवांच्या समस्येवर नियंत्रण येऊन अप्रिय घटना टळतील. 
- शकील देशमुख, पोलिस पाटील, अटाळी

Web Title: Atali Village Rumor