भाजप पदाधिकाऱ्याचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मोहाडी (जि. भंडारा), ता. 2 : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्‍टरवर जप्तीची कारवाई करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर वाळूतस्कर भाजप पदाधिकाऱ्याने संगनमत करून जीवघेणा हल्ला केला. यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. यावेळी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून त्यांच्या ताब्यात असलेली दोन ट्रॅक्‍टर पळवून नेले. ही घटना बुधवारी (ता. एक) रात्री एक वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील रोहा येथे घडली.

स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक बबन फुसाटे (वय 49) यांच्या नेतृत्वातील पथक रोहा परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, रोहा शेतशिवारात रेल्वे गेटजवळ दोन ट्रॅक्‍टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने दोन्ही ट्रॅक्‍टर अडवून कारवाई केली व या ट्रॅक्‍टरवर जप्तीची कारवाई करण्यासाठी मोहाडी पोलिसात आणत होते. दरम्यान, वाटेच पोलिस पथकास अडवून एम. एच. 36/ एन. 5983 क्रमांकाच्या दुचाकीने आलेल्या भाजप पदाधिकारी विश्‍वनाथ बांडेबुचे, कमलेश बांडेबुचे व अन्य दोघांनी पोलिसांशी वाद घातला. ट्रॅक्‍टर सोडण्यास नकार दिल्याने कमलेशने सहायक पोलिस निरीक्षक बबन पुसाटे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला. या वेळी पोलिस हवालदार सुधीर मडामे हे मदतीसाठी गेले असता भाजप पदाधिकारी विश्‍वनाथ बांडेबुचे यांनी लोखंडी रॉडने वार करून दुखापत केली. तसेच पोलिस शिपाई चेतन पोटे यांच्या हातावर लोखंडी रॉड मारून जखमी केले. यानंतर शासकीय पोलिस वाहनावर (क्रमांक एमएच 36/2225) दगडफेक करून नुकसान केले व पोलिसांच्या ताब्यात असलेली दोन्ही ट्रॅक्‍टर पळवून नेले. जखमी पोलिसांनी घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना देऊन उपचारासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड यांनी घटनास्थळ गाठून जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.
याप्रकरणी विश्‍वनाथ बांडेबुचे, ट्रॅक्‍टर चालक जनार्दन तितीरमारे, मार्कंड बांडेबुचे, कमलेश बांडेबुचे यांच्यासह अन्य दोघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कदम करीत आहेत.

Web Title: attack on cops