सोयाबीनवर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

वर्धा : पावसाने लावलेल्या सततच्या झडीमुळे पिकांची वाढ होत असली तरी त्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात सोयाबीनवर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसह उंटअळी आणि खोडमाशीने हल्ला चढविला आहे. यामुळे सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

वर्धा : पावसाने लावलेल्या सततच्या झडीमुळे पिकांची वाढ होत असली तरी त्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात सोयाबीनवर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसह उंटअळी आणि खोडमाशीने हल्ला चढविला आहे. यामुळे सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
पावसाच्या विलंबाने पेरण्यांना विलंब झाला. यातही पावसाने पेरण्या झाल्यानंतर मारलेल्या दडीमुळे पिकांची वाढ खुंटली. या काळात सोयाबीन फुलावर येत असल्याचे शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यातही सततचा पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात कपाशीपाठोपाठ सोयाबीनचा पेरा होत असतो. पण, यंदा या सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.
सोयाबीनवर हल्ला चढविणारी तंबाखूची पाने खाणारी अळी रातोरात सोयाबीनच्या पानांची चाळणी करते. तिच्या मदतीला उंटअळी आहेच. खोडमाशी झाडातील रस शोषत असल्याने वेळेपूर्वीच पीक पिवळे पडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर दिसून आला आहे. या किडीपासून पिकांचा बचाव करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्राने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात शेतकऱ्यांनी कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्‍लेम शिफारशीत इन्डोक्‍साकार्ब 15.7 एससी सहा मिली किंवा स्पायनेटोरम 11.7 एस.सी. नऊ मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यांनी सुचविलेल्या कीटकनाशकांचा वापर केल्यास सोयाबीनवर आलेल्या किडीचा प्रादुर्भाव नष्ट करणे शक्‍य होईल असे सांगण्यात आले आहे.
मका पिकावर लष्करी अळी
कमी खर्चाचे आणि अधिक उत्पन्नाचे पीक म्हणून शेतकरी सध्या मक्‍याच्या पिकाकडे बघत आहेत. अनेक शेतकरी या पिकाची लागवड करीत आहेत. देवळी तालुक्‍यातील ममदापूर भागात सेलसुरा येथील चमुने केलेल्या सर्वेक्षणात मक्‍याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसले. या अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरावेत. पक्षीथांबे उभारावे, अंडीपुंज आणि अळ्या वेचून नष्ट कराव्यात पाच टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भावानंतर इमामेकटिन बेंझोएट चार ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack of insects eating tobacco leaves on beans