महापौर जोशींवरील गोळीबाराची चौकशी क्राईम ब्रॅंच करणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावर दुचाकीस्वार दोन युवकांनी बेधुंद गोळीबार केला. या गोळीबार कांडाची मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेतली. आयुक्‍तांनी या गोळीबार कांडाचा तपास स्वतः घेतला असून, चौकशीसाठी गुन्हे शाखेचे पाच पथक नियुक्‍त करण्यात आले आहेत. 

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावर दुचाकीस्वार दोन युवकांनी बेधुंद गोळीबार केला. या गोळीबार कांडाची मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेतली. आयुक्‍तांनी या गोळीबार कांडाचा तपास स्वतः घेतला असून, चौकशीसाठी गुन्हे शाखेचे पाच पथक नियुक्‍त करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौर संदीप जोशी हे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जामठा रोडवरील रसरंजन ढाब्यावर आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपून एकापाठोपाठ सात कारने ते घरी परतत होते. जवळपास एक किमी अंतर पार केल्यानंतर दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोन युवकांनी सर्वात शेवटी असलेल्या महापौर जोशी यांच्या कारवर बेछुट गोळीबार केला. यापैकी चार गोळ्या जोशींच्या वाहनांचा भेद करून आतमध्ये घुसल्या. जोशी हे स्वतः कार चालवित होते. 

अधिक माहितीसाठी - महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार

साईड ग्लासमून जोशी यांच्यावर गोळी झाडण्यात आली. मात्र, जोशी यांनी प्रसंगावधान राखत खाली झुकल्यामुळे थोडक्‍यात बचावले. काही सेकंदाच्या अंतरामुळे जोशी यांचा जीव वाचला, अन्यथा एका गोळीने त्यांच्या डोक्‍याचा भेद घेतला असता. अचानक घडलेल्या या गोळीबार कांडामुळे सातही वाहने लगेच थांबली. घटनास्थळावरून दोन्ही हल्लेखोर पळून गेले. कारमधील मित्रांनी धावपळ केली तसेच पोलिसांना फोन केला. काही मिनिटांतच पोलिस मदतीसाठी धावले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Image may contain: 1 person, sitting
बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताना महापौर संदीप जोशी 

धमकी पत्राचे कनेक्‍शन

सहा डिसेंबरला शहरात नागरिकांच्या तक्रारींसाठी लावण्यात आलेल्या तक्रार पेटींमधून महापौर संदीप जोशी यांना दोनदा धमकीचे पत्र आले आहे. दोन्ही पत्रात "संदीप अभी भी संभल जा...वरना ठोक देंगे.' अशी धमकी देण्यात आली होती. त्या पत्रावरून सदर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते पत्र कुणी टाकले? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. 

क्लिक करा - #NagpurWinterSession : महापौरांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद

वरिष्ठांची घटनास्थळाला भेट

गोळीबाराच्या घटनेची पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. रात्रीच्या सुमारास सहपोलिस आयुक्‍त रवींद्र कदम, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे, उपायुक्‍त गजानन राजमाने आणि विनीता साहू यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचा ठोकताळा काढून आरोपींची दिशा आणि हल्ल्याबाबत बरीच माहिती गोळा केली. 

सीसीटीव्ही फुटेजचा आधार

पोलिसांनी रसरंग ढाब्यावरील सीसीटीव्ही तसेच ज्या रस्त्यावर हल्ला झाला आहे, त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. फुटेजमधील सर्व वाहनांची चौकशी आणि तपास सुरू आहेत. दुचाकींवरील संशयीत दोन्ही आरोपींबाबत पोलिस माहिती गोळा करीत आहेत. गोळीबाराचा छडा लावण्यात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमुळे बरीच मदत होणार आहे. 

Image may contain: 1 person, hat

तपास माझ्या मार्गदर्शनाखाली 
महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची चौकशी पोलिस करीत आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दोनदा आलेल्या धमकी पत्राचे काही कनेक्‍शन आहे का? याबाबतही आम्ही तपास करीत आहोत. घटनास्थळाला मी स्वतः आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. या प्रकरणाचा तपास माझ्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. गोळीबार कांडातील आरोपींच्या लवकरच मुसक्‍या आवळण्यात येतील. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, शहराचे पोलिस आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on Mayor joshi, Crime branch investigating case