एका मित्राचा दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

हिंगणा (नागपूर) : शनिवारी (ता. 8) दुपारी बाराच्या सुमारास वानाडोंगरी परिसरातील वायसीसीई कॉलेजसमोर असलेल्या पंक्‍चरच्या दुकानात क्षुल्लक कारणावरून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्‍यावर दुकानातील लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला व हल्लेखोर मित्र घटनास्थळावरून लगेच पसार झाला.

हिंगणा (नागपूर) : शनिवारी (ता. 8) दुपारी बाराच्या सुमारास वानाडोंगरी परिसरातील वायसीसीई कॉलेजसमोर असलेल्या पंक्‍चरच्या दुकानात क्षुल्लक कारणावरून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्‍यावर दुकानातील लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला व हल्लेखोर मित्र घटनास्थळावरून लगेच पसार झाला.
हेमंत प्रभाकर वरले (वय 32, प्रगतीनगर, जयताळा) असे जखमीचे नाव आहे. त्याला लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह येथे आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. आरोपी जितेंद्र तेजसिंग वाघमारे (वय 26, रमाबाई आंबेडकरनगर, जयताळा) नागपूर याला एमआयडीसी पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच जयताळा परिसरातून अटक केली. त्याने वेळेवरच झालेल्या किरकोळ वादातून मित्रावर हल्ला केल्याचे कबूल केले.
जखमी हेमंत व आरोपी जितेंद्र हे जयताळा परिसरात शेजारी राहत होते. दोघेही ड्रायव्हर असल्याने त्यांची मैत्री होती. शनिवारी दोघेही एकाच दुचाकीवर बसून वायसीसीई कॉलेज गेटसमोर असलेल्या एका पंक्‍चर दुरुस्तीच्या दुकानात आले. काही वेळाने हेमंतला फोन आला. तो मोबाईलवर कुणाशी तरी बोलत असताना आरोपी जितेंद्रने दुकानात असलेला टायर खोलण्याचा लोखंडी रॉड घेऊन हेमंतच्या डोक्‍यावर पाच-सहा वार केले. मित्राला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भारत क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक राजू वानखेडे, अजय जाधव, देवानंद बघमारे, विजय मानापुरे, सिद्धार्थ तामगाडगे, अरविंद मोहोड, जीवन भातकुळे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. जखमी हेमंतला आधी डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळी दुचाकी होती, त्यावरून जखमीची ओळख पटविली व घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यावरून आरोपीचा शोध सुरू केला. एका शोध पथकाने जयताळा परिसरात आरोपीला दुपारी चार वाजताच्या सुमारास अटक केली. जखमी हेमंतच्या डोक्‍यावर जबर जखमा असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Attack news