दारू तस्करी प्रकरणातील अर्थकारणातून पोलिस उपनिरिक्षकावर हल्ला!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांच्यावर दारूतस्करांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमाराला घडली. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. हल्लेखोर सध्या फरार आहे.

चंद्रपूर : आपला गुन्हा पकडल्या जाऊ नये म्हणून गुन्हेगार कुठल्याही थराला जाऊ शकतात. याचे उदाहरण म्हणजे दारू तस्करी प्रकरणात पाठलाग करणाऱ्या पोलिस उपनिरिक्षकावरच दारू तस्करांनी हल्ला केला. यामागे तस्कर आणि पोलिस यांच्यातील अर्थकारण असल्याचे बोलले जात आहे.
रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांच्यावर दारूतस्करांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमाराला घडली. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. हल्लेखोर सध्या फरार आहे.
लाकडे यांना दारू घेवून येणाऱ्या वाहनाची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पाठपुरावा केला असता रय्यतवारी कॉलनी परिसरात ते वाहन आढळून आले. लाकडे यांनी वाहनाचा पाठलाग केला. पोलिस मागावर असल्याची कुणकुण तस्कराला लागली. तो वाहनासह महाकाली परिसरातील आपल्या घरी पोहोचला. लाकडे आणि पोलिस कर्मचारी त्या घरी पोहोचले. वाहनाची झडती घेतली असता चार पेट्या देशी दारू आढळून आली. त्यानंतर दारूतस्कर अमित गुप्ता आणि त्याचे वडील माकन गुप्ता यांना पोलिस ठाण्यात नेत असताना त्यांनी लाकडे यांच्यावर हल्ला केला. यात लाकडे यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर दोघेही बापलेक फरार झाला. या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाकडे यांच्या हल्ल्यामागे पोलिस आणि दारू तस्करांचे अर्थकारण असल्याचे बोलले जात आहे. लाकडे आधी उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकात होते. त्यानंतर त्यांची बदली रामनगर पोलिस ठाण्यात झाली. या ठाण्यातील गुन्हे शोध पथकात मागील सात-आठ वर्षांपासून काही कर्मचारी काम करीत आहेत.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित

त्यांचे दारूतस्कारांशी लागेबांधे आहेत. अशावेळी दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर कारवाई केली तर तेही चक्रावून जातात. आम्ही सर्व मागण्या पूर्ण करतो. त्यानंतर कारवाई का? या कारणावरून ते अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाही. लाकडे यांच्या प्रकरणालाही हीच किनार असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे. याप्रकरणी पाच दारू तस्करांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on police by liquor smuggler