लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आर्वी (जि. वर्धा) : नगरसेवक रामू राठी व त्याच्या साथीदारांनी विठ्ठल वॉर्डात जाऊन तलवार, लाठीकाठी व लोखंडी रॉडने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

आर्वी (जि. वर्धा) : नगरसेवक रामू राठी व त्याच्या साथीदारांनी विठ्ठल वॉर्डात जाऊन तलवार, लाठीकाठी व लोखंडी रॉडने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
शनिवारी (ता.3) च्या रात्री 11 वाजताच्या सुमारास येथील विठ्ठल वॉर्डात ही घटना घडली. राजकीय वादातून हा हल्ला गेल्याचा आरोप आहे. यातील जखमीचे नाव ललित विजय मेश्राम असून तो विठ्ठल वॉर्डातील रहिवासी आहे. तर सुमीत शिंगाणे व कार्तिक कारमोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी (ता.3) रात्री विक्की सूर्यवंशी याने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून ललितचा मोठा भाऊ नीतेश मेश्राम याला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर बोलावले. तेथे नगरसेवक रामू राठी, बाल्या वानखेडे, अमित शिंगाणे, सुमीत शिंगाणे, सुनील सारसर, पुनीत छंगणी, नाना गिरोले, कार्तिक कारमोरे, मंगेश लाडके आदी उपस्थित होते. त्यांनी नगरसेवक रामू राठी यांच्यासोबत असलेल्या राजकीय गटबाजीवरून धाकदपट करणे सुरू केले. मात्र, नीतेश मेश्राम याने त्याकडे लक्ष दिले नाही व तो विठ्ठल वॉर्डातील घरी परत आला. त्याच्या मागोमाग रामू राठी, पुनीत छंगाणी, अमित शिगांणे, बाल्या वानखेडे हे बुलेट व इतर दुचाकीने तर, कार्तिक कारमोरे, मंगेश लाडके, सुनील सारसर हे पायदळ नीतेश मेश्राम यांच्या घराकडे आले. त्यांच्या हातातील तलवार, लाठ्याकाठ्या पाहून तो घरात पळाला. त्याचा लहान भाऊ ललित मेश्राम घरासमोर अंगणात उभा होता. बाल्या वानखेडे, पुनीत छंगाणी, अमित शिंगाणे यांनी तलवारीने त्याच्या डोक्‍यावर व पाठीवर वार केला. तर, सुमीत शिंगाणे यांनी लोखंडी रॉडने व सुनील सारसर, नाना गिरोले, कार्तिक कारमोरे, मंगेश लाडके यांनी हातातील काठ्यांनी व लाथाबुक्‍यांनी त्याला मारहाण केली. यात ललित मेश्राम हा रक्तबंबाळ झाला. दाराच्या फटीतून नीतेश हे सर्व पाहत होता व जोरजोरात ओरडत होता. त्याचे ओरडणे ऐकून मोहल्यातील शुभम सूर्यवंशी, विक्की सूर्यवंशी, सुधाकर ईवनाथे धावत आले. त्यांना पाहून मारेकऱ्यांनी पलायन केले. मोहल्यातील लोकांच्या मदतीने जखमी ललित मेश्राम याला पोलिस स्टेशनमध्ये आणून नीतेश मेश्राम याने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने ललितला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack with a sword and an iron rod