पतीचा पत्नीसह मेहुणीवर ब्लेडने हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मंगळवारी दुपारी दोघी घरी असताना गजानन अर्चना येरेकर यांच्याकडे आला व सीमासोबत वाद करू लागला. त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन गजाननने सीमावर ब्लेडने हल्ला केला. त्याचवेळी मोठी बहीण अर्चना येरेकर तिला सोडविण्यासाठी गेली असता गजाननने तिच्या गळ्याभोवतीही ब्लेडने वार केले.

हिंगणघाट (जि. वर्धा)  : घरगुती वादातून पत्नी आणि तिच्या मोठ्या बहिणीवर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची घटना आज भाऊबिजेच्या दिवशी दुपारी 12.30 वाजता येथील यशवंतनगरात घडली. या दोन्ही बहिणींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. 
सविस्तर वृत्त असे की, गाडगेबाबा वॉर्ड येथे राहणारा हल्लेखोर गजानन ज्ञानेश्‍वर उंबरकर (वय 35) आणि त्याची पत्नी सीमा उंबरकर यांच्यात वाद होता. या वादाला कंटाळून सीमा आठ दिवसांपूर्वी यशवंतनगरात राहणारी मोठी बहीण अर्चना भय्याजी येरेकर (वय 45) हिच्याकडे राहायला गेली होती. आज, मंगळवारी दुपारी दोघी घरी असताना गजानन अर्चना येरेकर यांच्याकडे आला व सीमासोबत वाद करू लागला. त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन गजाननने सीमावर ब्लेडने हल्ला केला. त्याचवेळी मोठी बहीण अर्चना येरेकर तिला सोडविण्यासाठी गेली असता गजाननने तिच्या गळ्याभोवतीही ब्लेडने वार केले. या हल्ल्यात जखमी दोन्ही बहिणींनी आरडाओरड केल्याने गजाननने तेथून पळ काढला. ब्लेडच्या हल्ल्यात दोघी बहिणी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. 
पोलिसांनी गजानन उंबरकर याच्यावर जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. या दोघी बहिणी आज भाऊबिजेकरिता आपल्या माहेरी सोईट येथे राहणाऱ्या भावाकडे जाण्याच्या तयारीत होत्या. मात्र, त्याचवेळी त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attacks with Blade on wife and sister in law