मेयोत जन्मलेले बाळ पळवण्याचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या वॉर्डात बुधवारी जन्मलेल्या एका बाळाला पळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी हाणून पाडला होता. तर दुसऱ्या घटनेत गुरुवारी येथील सर्जिकल कॉम्प्लेक्‍सच्या वॉर्डात सर्रास परिचारिका म्हणून वावरणाऱ्या तोतया परिचारिकेला पकडण्यात जवानांना यश आले आहे. दोन्ही महिलांना मेयो प्रशासनाने तहसील पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या वॉर्डात बुधवारी जन्मलेल्या एका बाळाला पळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी हाणून पाडला होता. तर दुसऱ्या घटनेत गुरुवारी येथील सर्जिकल कॉम्प्लेक्‍सच्या वॉर्डात सर्रास परिचारिका म्हणून वावरणाऱ्या तोतया परिचारिकेला पकडण्यात जवानांना यश आले आहे. दोन्ही महिलांना मेयो प्रशासनाने तहसील पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
पहिली घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. मेयोच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर एका अनोळखी महिलेने या बाळाला सुरुवातीला कुशीत घेत तिच्या नातेवाइकांशी ओळख केली. काही वेळात नातेवाइकांचे लक्ष विचलित होताच तिने बाळाला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एका महिला सुरक्षारक्षकांचे लक्ष गेल्यावर तिने महिलेला पकडले. हा प्रकार पुढे येताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. तातडीने महिलेला तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चौकशीत ती मानसिक रुग्ण असल्याचे पुढे आले.
दुसरी घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्‍समध्ये घडली. येथे दोन दिवसांपासून परिचारिकेच्या वेशात अनोळखी महिला फिरत होती. सेवेवरील महिला सुरक्षा रक्षकांनी तिला अडवून विचारणा केली. तिच्याकडे मेडिकल चौक परिसरातील एका खासगी संस्थेचे ओळखपत्र आढळले. तपासात या नावाने मेडिकल चौकात एकही संस्था नसल्याचे पुढे आले. मेयोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत महिला सुरक्षा रक्षकांनी संबंधित महिलेच्या सामानाची तपासणी केली केली. त्यात काही रुग्णांचे नाव, त्यांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्याही नोंदी आढळल्या. घटनेचे गांभीर्य बघत महिलेला तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दोन्ही घटनांचे गांभीर्य बघता मेयोच्या वॉर्डातील रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मेयोत नातेवाइकांना पास पद्धत बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांत दोन गैरप्रकार करणाऱ्या महिलांना पकडण्यात प्रशासनाला यश आले आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार रुग्णालयात एक किंवा दोनच नातेवाइकांना प्रशासनाला प्रवेश देता येतो. नातेवाइकांनीही हा धक्कादायक प्रकार बघता प्रशासनाला पास बंधनकारक करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
- डॉ. सागर पांडे, उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The attempt to flee Mayo's child is unsuccessful