बापरे, चक्क ग्रामविकास अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, वाचा काय झाला प्रकार... 

रूपेश खैरी
Friday, 31 July 2020

अमोल बानकर, तारिक शेख आणि कुणाल इखार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना न्यायालयात सादर करून त्यांची पोलिस कोठडी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

वर्धा : व्यावसायिक वादातून एका कंत्राटदाराने ग्रामविकास अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार रामनगर पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. यातील एक कंत्राटदार आहे. तर दुसरा सुपारी घेणारा आणि तिसरा हल्ला करणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
  
अमोल बानकर, तारिक शेख आणि कुणाल इखार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना न्यायालयात सादर करून त्यांची पोलिस कोठडी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा प्रकार उघड करण्याकरिता पोलिसांना तब्बल दोन महिन्यांचा काळ लागला. यामुळे वर्धेत सुपारी घेण्याचा प्रकार सुरू झाल्याने पोलिसांसमोर हे नवे आव्हान आले आहे.  

येथील ग्रामविकास अधिकारी हेमंत देवतळे यांच्यावर त्यांच्या घरीच चाकूहल्ला झाला. यात ते जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. यात मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांचा अमोल वनकर याच्याशी व्यावसायिक वाद असल्याचे पुढे आले. 

हेही वाचा - तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...
 

यावरून अमोलला ताब्यात घेत विचारणा करण्यात आली. यात त्याने तारिक शेख याला ग्रामविकास अधिकाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले. यावरून तारिकला ताब्यात घेत त्याने मारण्याकरिता कुणाल इखार याला पाठविल्याचे कबूल केले. यावरून तिघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात रामगनर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनाजी जळक, पोलिस उपनिरीक्षक श्री. मिश्रा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.  
 

व्यवहाराबाबत तपास सुरू

 
सुपारी देण्याच्या या प्रकारात किती रुपयांचा व्यवहार झाला, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. सध्या तिघांनीही नेमकी किती रक्कम घेतली याची माहिती दिली नाही. या तिघांनाही पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली असून, या काळात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता ठाणेदार धनाजी जळक यांनी वर्तविली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted murder a village development officer; Three arrested