सावत्र आईला जाळून मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर : सख्ख्या आईप्रमाणे प्रेम देत लहानाचे मोठे केलेल्या सावत्र आईला मुलानेच पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना एमआयडीसी परिसरात घडली. प्रशांत ऊर्फ गोलू वसंत मडावी (वय 30, रा. महानजवाडी, वानाडोंगरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत ऊर्फ गोलू हा लहान असताना त्याची आई वारली. त्यावेळी प्रशांत केवळ तीन वर्षांचा होता. प्रशांतचे योग्य संगोपन व्हावे म्हणून त्याच्या वडिलांनी सुनीता मडावी (वय 52) हिच्यासोबत दुसरे लग्न केले. सावत्र आईने मुलांना लहानाचे मोठे केले. प्रशांत मोठा झाल्यानंतर त्याच्या सावत्र आईचा तिरस्कार करीत होता. त्यावरून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. प्रशांत हा ट्रक चालवायचा. रविवारी त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते; त्यामुळे एका मित्राकडून बाटलीत पेट्रोल आणले होते. रात्री 10 च्या सुमारास तो घरी आला आणि त्याने सावत्र आईला जेवण मागितले. अजून स्वयंपाक व्हायचा आहे, असे त्याच्या आईने म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या प्रशांतने बाटलीतील पेट्रोल आईच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. गंभीर अवस्थेत जळाल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रशांतला अटक केली. सावत्र आईची प्रकृती सध्या नाजूक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to burn step mother