अधिकाऱ्यांच्या "समृद्धी'ची चौकशी होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. मंगळवारी (ता.13) "सकाळ'ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. 

नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. मंगळवारी (ता.13) "सकाळ'ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच यासंदर्भात विधानसभा नियम 57 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत चर्चेचा आग्रहही धरला. पाटील म्हणाले, ""समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनींची खरेदी केली आहे. तसेच या जमिनी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यांमधील या जमिनी सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावावर खरेदी केल्या आहेत. हा मोठा जमीन गैरव्यवहार असून याची चौकशी व्हावी.'' 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी संबंधित खरेदीदार अधिकाऱ्यांची नावे सभागृहात सांगावीत अशी मागणी केली. मात्र, जयंत पाटील यांनी संबंधितांची नावे सभागृहात सांगण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडे दिली जातील असे स्पष्ट केले. कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, ठाणे महापालिका कार्यालयातील उच्चपदस्थ तसेच काही माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मुलांच्या नावाने या जमिनी खरेदी केल्या आहेत, असे सांगण्यात येते फडणवीस म्हणाले, ""या महामार्गासाठी ठाणे, नगर, अमरावती आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जमीन संपादित करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना जमिनींच्या बदल्यात आर्थिक मोबदल्यासोबत विकसित भूखंड दिले जाणार आहेत. त्यामुळे कोणी जमिनी खरेदी केल्या असतील तर, त्यांना त्याचे लाभ मिळणार नाहीत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून या जमिनींची खरेदी झाली असेल तर कोणत्या पैशातून ही खरेदी झाली याचे स्त्रोत तपासले जातील आणि त्याची चौकशी केली जाईल.'' 

दरम्यान, "सकाळ'च्या वृत्ताचे विधिमंडळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत जाधव आणि कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचना मांडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत या संदर्भातील लक्षवेधी सूचना चर्चेला येण्याची शक्‍यता आहे. 

"अधिकाऱ्यांना पदावरून दूर ठेवा' 
आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नवनगर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातील संबंधित अधिकाऱ्यांची नावे वाचून दाखवली. तसेच त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली. 

Web Title: Authorities samrddhi be examined