"ऑटिझम'ग्रस्त मुलांना उपराजधानीत मायेचा हात

नागपूर : आपल्या कल्पनेतील भावविश्‍व साकारताना ऑटिझमग्रस्त विद्यार्थी.
नागपूर : आपल्या कल्पनेतील भावविश्‍व साकारताना ऑटिझमग्रस्त विद्यार्थी.

नागपूर : ऑटिझम तसेच बहुविकलांगता घेऊन जन्माला आलेली मुले देवाघरची फुले असली तरी काही मुले हाडामांसाचा गोळा असतात. अशा मुलांवर संस्कार तर सोडा, त्यांना त्यांचे नैसर्गिक व्यवहारही कळत नाहीत. अशा बालमनाच्या वेदना जाणून त्यांच्यावर संस्कार करीत त्यांच्या पंखांना बळ देणारी "संवेदना' ही शाळा नागपुरात आहे. 14 वर्षांपूर्वी उपराजधानीत अशोक कॉलनी, खामला रोड येथे "स्कूल ऑफ चिल्ड्रेन ऍण्ड ऑटिझम' ही विशेष मुलांची शाळा कांचन गोखले यांनी सुरू केली. विशेष म्हणजे, गोखले यांचा मुलगा ऑटिझमने ग्रस्त आहे. त्याला घडविण्याच्या प्रेरणेतून त्यांना शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
ऑटिझम रोग नाही, तर मेंदूची एक अवस्था आहे. ही मुलं-मुली अगदी सामान्य मुलांसारखी खेळतात, उड्या मारतात. किंबहुना इतर मुलांपेक्षा कधी कधी जास्त उंचीवर चढतात. मात्र, दोन-तीन वर्षांचे झाले की ही मुले वेगळे वागताना जाणवतात. हाक मारली तरी लक्ष देत नाहीत. बोटाने खाणाखुणा करीत नाही. खूप प्रकाश बघितल्यावर गोंधळतात. ऑटिझम मुळात "न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर' आहे. ऑटिझमग्रस्त मुलांच्या पालकांच्या दुःखाचा हिशेब तर शब्दांत मांडता येत नाही. आमच्यानंतर मुलांचा काय होईल? या विचाराने पालक गोंधळून जातात. अशा पालकांना धीर देण्याचं काम कांचन गोखले आणि त्यांच्या सासू ज्योती फडके 2006 पासून करीत आहेत. त्यांचे घर म्हणजे एकप्रकारे विशेष मुलांच्या कलागुणांनी बहरलेला बगीचाच झाला आहे. शाळेतर्फे उन्हाळ्यात या मुलांसाठी खास शिबिर घेण्यात आले. या मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे छोटेखानी प्रदर्शनही येथे भरविण्यात आले होते.
या विशेष मुलांना शिक्षण व संस्कार देत स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या दिशेने "संवेदना'ची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या बुद्धीला चालना देत या मुलांच्या आकलनशक्तीचा, त्यांच्यातील क्षमतांचा, त्यांच्या कामाच्या गतीचा विचार करून प्रशिक्षण देण्याचे काम गोखले कुटुंबीय
करीत आहेत.
ऑटिझमग्रस्त मुलांसाठी ही वैशिष्ट्यपूर्ण शाळा आहे. केवळ सात मुलांपासून शाळा सुरू केली. आता या शाळेत 33 मुले आहेत. स्पिच थेरपीपासून तर एसआय थेरपी, वर्तनाचा अभ्यास, हिअरिंग असे विविध विषय हाताळले जातात. शाळेचा विस्तार बघता आता पालिकेपासून स्वयंसेवी संस्थांकडून मदतीची आवश्‍यकता आहे. "चिल्ड्रेन विथ डिफरंट ऍबिलिटीज्‌' अशी सुविधायुक्त शाळा आणि प्रशिक्षण केंद्र आहे. ऑटिझमसह अध्ययन अक्षमता, बहुअपंगत्व, सेरेब्रल पाल्सी अशा अनेक प्रकारच्या विशेष मुलांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची सोय येथे आहे.
- कांचन गोखले, संचालिका, संवेदना

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com