ऑटोचालकाच्या मुलीने जिंकले प्रथमच ब्रॉंझपदक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नागपूर ः रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटनेच्या यजमानपदाखाली डेरवण येथे शनिवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ऑटोचालकाची मुलगी असलेल्या नागपूरच्या मिताली भोयरने 16 वर्षे वयोगटातील दोन हजार मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक जिंकले. विशेष म्हणजे राज्य स्पर्धेतील हे तिचे पहिलेच पदक होय. 14 वर्षे मुलांच्या शंभर मीटर शर्यतीत नागपूरच्या ओम इटकेलवारने सुवर्णपदक जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. हे दोन्ही ऍथलिट्‌ नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे खेळाडू आहेत.

नागपूर ः रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटनेच्या यजमानपदाखाली डेरवण येथे शनिवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ऑटोचालकाची मुलगी असलेल्या नागपूरच्या मिताली भोयरने 16 वर्षे वयोगटातील दोन हजार मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक जिंकले. विशेष म्हणजे राज्य स्पर्धेतील हे तिचे पहिलेच पदक होय. 14 वर्षे मुलांच्या शंभर मीटर शर्यतीत नागपूरच्या ओम इटकेलवारने सुवर्णपदक जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. हे दोन्ही ऍथलिट्‌ नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे खेळाडू आहेत. पंडित बच्छराज व्यास विद्यालयाची विद्यार्थिनी असलेली मिताली शाळेचे क्रीडाशिक्षक आणि नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सराव करते. तिने शर्यत 6 मिनिटे 52 सेकंदांत पूर्ण केली. मुलांच्या दोन हजार मीटर शर्यतीत नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या सुधनवा ढेंगेला प्रथम तीन क्रमांकात स्थान मिळविता आले नसले तरी त्याने जिल्हा स्पर्धेत नोंदविलेल्या वेळेत तब्बल तीस सेकंदांची सुधारणा केली. त्याने 6 मिनिटे 12 सेकंदात शर्यत पूर्ण केली. पंडित बच्छराज व्यास विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओम इटकेलवारने 14 वर्षे मुलांच्या शंभर मीटर शर्यतीत 12.34 सेकंद वेळ देत सुवर्णपदक जिंकले. तो प्राथमिक व उपांत्य फेरीतही अव्वल स्थानावर होता. संघटनेच्या राज्य स्पर्धेत शंभर मीटर शर्यत जिंकण्याची ही नागपूरच्या खेळाडूची बहुधा पहिली वेळ असावी. या कामगिरीबद्दल दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भाऊ काणे, प्रशिक्षक धनंजय काणे, वैशाली चतारे, नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सचिव प्रशांत जगताप, कोषाध्यक्ष शिरीश भगत, चारुलता नायगावकर-बेहरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Driver daughter won the bronze medal