सरासरी पावसाने हजारी गाठलीय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : सुरुवातीला हुलकावणी दिल्यानंतर मॉन्सूनने अचानक जोर पकडत आश्‍चर्यजनकरित्या सरासरी गाठली. शहरात 1016 मिलिमीटर पाऊस झाला असून, गडचिरोली जिल्ह्याने पावसाच्या सरासरीत बाजी मारली आहे. दमदार पावसामुळे विदर्भातील बहुतांश जलाशये तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे संभाव्य संकटही दूर झाले आहे.

नागपूर : सुरुवातीला हुलकावणी दिल्यानंतर मॉन्सूनने अचानक जोर पकडत आश्‍चर्यजनकरित्या सरासरी गाठली. शहरात 1016 मिलिमीटर पाऊस झाला असून, गडचिरोली जिल्ह्याने पावसाच्या सरासरीत बाजी मारली आहे. दमदार पावसामुळे विदर्भातील बहुतांश जलाशये तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे संभाव्य संकटही दूर झाले आहे.
अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर वरुणराजाने त्यानंतर विदर्भावर चांगलीच मेहरबानी केली. यवतमाळ व वाशीमचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावून सप्टेंबर अखेरपूर्वीच सरासरी गाठली. विदर्भात आतापर्यंत 943 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जो सरासरीच्या सहा टक्‍के अधिक आहे. गतवर्षी 875 मिलिमीटर व त्याअगोदर 2017 मध्ये केवळ 731 मिलिमीटर पाऊस पडला होता. विदर्भात यंदा सर्वाधिक पावसाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली. येथे सरासरीच्या तब्बल 47 टक्‍के अधिक (1747 मिलिमीटर) पाऊस झाला. तर यवतमाळ येथे (500 मिलिमीटर) सरासरीच्या 34 टक्‍के आणि वाशीम येथे (526 मिलिमीटर) 29 टक्‍के कमी पावसाची नोंद करण्यात आली. मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्यानंतर जून महिन्यात विदर्भात केवळ 91 मिलिमीटर पाऊस पडला. मात्र, त्यानंतर जुलैमध्ये 340 मिलिमीटर व ऑगस्टमध्ये 321 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत 190 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. दमदार पावसामुळे नागपूर व विदर्भातील गोसेखुर्द व इरईसह उपराजधानीला पाणीपुरवठा करणारे पेंच (तोतलाडोह) व कामठी खैरी जलाशयही बऱ्याच वर्षांनंतर तुडुंब भरले आहेत.
परतीचा प्रवास लांबणार
एरवी, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, यावर्षी पावसाचा मुक्‍काम थोडा लांबण्याची शक्‍यता आहे. कारण सध्या मध्य व पश्‍चिम भारतात सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह विदर्भातही पुढील काही दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The average rainfall has reached thousands