विदर्भात पाऊस सरासरी एवढाच!

file photo
file photo

नागपूर  : भारतीय हवामान विभागाने देशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला. आतापर्यंत मॉन्सूनने विदर्भात दगा दिला असला, तरी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेने चिंता करण्याचे काहीएक कारण नाही. पुढील दोन महिन्यांत दमदार पाऊस होणार असून, पावसाची सर्व तूट भरून निघेल, अशी शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी व्यक्‍त केली. लवकरच बंगालच्या उपसागरात दोन "सिस्टिम्स' तयार होत असल्याने या आठवड्यात विदर्भात जोरदार पाऊस पडेल, असेही ते म्हणाले. सध्याची पावसाची स्थिती आणि पुढील अंदाजाबद्दल साहू यांनी "सकाळ'ला ही सविस्तर माहिती दिली.
प्र : हवामान विभागाने सरासरी पावसाचा अंदाज वर्तवूनही आतापर्यंत मॉन्सूनने निराशा केली. यंदाच्या पावसाळ्यात परिस्थिती कशी राहील?
उ : हवामान विभागाने पावसाळ्यापूर्वी मॉन्सूनबद्दल दीर्घकालीन अंदाज वर्तविताना यावर्षी संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्या अंदाजावर हवामान विभाग अजूनही ठाम आहे. आतापर्यंत विदर्भात मॉन्सूनने निराशा केली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये दमदार पाऊस पडेल, अशी मला आशा आहे. जुलैमध्ये दरवर्षीच चांगला पाऊस पडतो. मात्र, यावर्षीचे चित्र थोडे निराशाजनक ठरले. तथापि, सध्या 48 टक्‍के असलेली पावसाची तूट निश्‍चितच भरून निघेल, यात शंका नाही.
प्र : विदर्भात यावर्षी कमी पाऊस पडण्याचे नेमके कोणते कारण सांगता येईल?
उ : कमी पावसासाठी नेमके एक कारण देता येणार नाही. याला अनेक बाबी जबाबदार आहेत. यावर्षी मॉन्सूनवर अल निनोचा प्रभाव तर होताच, शिवाय विदर्भात जोरदार पावसासाठी कारणीभूत ठरणाऱ्या "सिस्टिम्स'ही बंगालच्या उपसागरात बनल्या नाहीत. साधारणपणे बंगालच्या उपसागरातील "सिस्टिम्स'मुळे विदर्भात सर्वाधिक पाऊस पडतो. दुर्दैवाने यंदा अशा "सिस्टिम्स' फार बनल्या नाहीत. शिवाय यंदा मॉन्सूनही विदर्भात उशिरा पोहोचला आहे.
प्र : "ग्लोबल वॉर्मिंग'मुळे कमी पाऊस व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली काय?
उ : "ग्लोबल वॉर्मिंग' किंवा "क्‍लायमेंट चेंज'मुळे विदर्भात कमी पाऊस पडला, असे मी म्हणणार नाही. असे असते तर दरवर्षीच ही परिस्थिती उद्‌भवली असती. मागील काही वर्षांतील पावसाचा रेकॉर्ड बघितल्यास विदर्भात नेहमीच चांगला पाऊस पडला आहे. यावर्षीही पाऊस सरासरी गाठेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
प्र : हवामान विभागाने सरासरी पावसाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना अंधारात ठेवले आहे, असा तुमच्या विभागावर आरोप होतो. यावर तुमचे मत काय?
उ : हवामान विभाग अनेक "पॅरामीटर्स'चा विचारपूर्वक अभ्यास करून पावसाबद्दलचे अंदाज वर्तवित असतात. परिस्थिती बदलली की पाऊसही कमीजास्त होतो. हवामान विभागाने नेहमीच अचूक अंदाज वर्तवून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हवामान विभागावर असे आरोप करणे चुकीचे आहे.
प्र : विदेशांमध्ये पावसाबद्दलचे अचूक अंदाज वर्तविले जातात. अचूकतेसाठी भारतात अद्याप तंत्रज्ञान विकसित झाले नाही काय?
उ : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज कमीअधिक प्रमाणात नेहमीच अचूक ठरले आहे. अनेक विदेशीतज्ज्ञांनी अचूकतेबद्दल भारतीय हवामान विभागाचे कौतुक केले आहे. मलाही विदेशात असताना हा अनुभव आलेला आहे. हवामानाबद्दल अंदाज वर्तविणारी जगातील "बेस्ट टेक्‍नॉलॉजी' आमच्याकडे सध्या उपलब्ध आहे.
प्र : यापुढे पावसाबद्दल काय परिस्थिती राहील?
उ : विदर्भात पुढील दोन महिन्यांमध्ये चांगला पाऊस पडून तूट भरून निघेल, अशी मला आशा आहे. 25 जुलै व त्यानंतर एक ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागरात दोन "सिस्टिम्स' तयार होत असल्यामुळे लवकरच विदर्भात दमदार पाऊस पडेल, अशी दाट शक्‍यता आहे. 27 जुलैपासून विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com