अमरावतीत तीन वाजेपर्यंत सरासरी 33 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

- काही ठिकाणी मतदानाला गालबोट
- आघाडीच्या उमेदवाराची गाडी जाळली

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अमरावती जिल्ह्यात गालबोट लागले. मोर्शी मतदारसंघातील उमेदवाराचे वाहन जाळण्यात आले; तर काही केंद्रांवरील ईव्हीएम यंत्र बंद पडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 33 टक्के मतदानाची नोंद झाली.
अमरावती मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. शहरातील वडाळी तसेच नवसारी मनपा शाळा केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने काही काळ मतदान खोळंबले होते. एका केंद्रावरील ईव्हीएम दोन तास बंद पडले होते. मोर्शी मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांचे विरोधकांनी वाहन जाळले तसेच गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तिवसा मतदान केंद्रावर उमेदवाराचे नाव व बोधचिन्ह असलेल्या मतदानचिठ्ठ्या सापडल्याने काही काळ गोंधळ झाला. तथापि, धारणी येथे 90 वर्षांच्या वृद्धेने मतदान केले असून आता जिल्ह्यात मतदानाचा टक्केवारी वाढण्याची शक्‍यता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The average voter turnout in Amravati till three o'clock