esakal | CoronaVirus: धार्मिक स्थळी लोकांचे एकत्रिकरण टाळा

बोलून बातमी शोधा

Avoid gathering people in akola religious places

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील विविध भागात प्रार्थना स्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना, दर्शन आदींसाठी लोकांचे एकत्रिकरण टाळावे व तसे लोकांना आवाहन  मंदिर ट्रस्टी, धर्मगुरु, मौलवी यांनी आपल्यास्तरावरुन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

CoronaVirus: धार्मिक स्थळी लोकांचे एकत्रिकरण टाळा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील विविध भागात प्रार्थना स्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना, दर्शन आदींसाठी लोकांचे एकत्रिकरण टाळावे व तसे लोकांना आवाहन  मंदिर ट्रस्टी, धर्मगुरु, मौलवी यांनी आपल्यास्तरावरुन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.


शहरातील विविध मंदिर,मशिद, गुरुद्वारा, चर्च, जैन मंदिरांचे प्रमुख पुजारी, गुरु, ट्रस्टी, धर्मगुरु,मौलवींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी  नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते. 

लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय स्वीकारणार
मंदिर वा अन्य प्रार्थनास्थळांमध्ये भाविकांची गर्दी टाळण्यासाठी लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे दर्शन सुविधा देण्याचा पर्याय यावेळी समोर आला. ॲलायन्स चर्चचे डॉ. पी.डी. इंगळे, आशिष बिजोरीकर  यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या इस्टर पर्यंतच्या नियोजित प्रार्थनांचे लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय स्वीकारून त्याद्वारे लोकांना प्रार्थनेत सहभागी करून घेणार आहेत. याच प्रमाणे अन्य मंदिर व प्रार्थना स्थळांनीही या पर्यायाबाबत सकारात्मकता दर्शविली.

कुणीही रुग्ण बुधवारी दाखल नाही
बुधवारी (ता.18) सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. अथवा विदेशातून कोणीही आले नाहीत. कालपर्यंत विदेशातून आलेल्या एकूण 46  प्रवाशांपैकी 43 जणांचा संपर्क करण्यात आला होता. 35 जण गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) आहेत. उर्वरित प्रवाशांपैकी चौघे हे अमरावती येथे आहेत. दोन प्रवासी नागपूर येथे आहे. ते अद्याप अकोला जिल्ह्यात आलेले नाहीत तर अन्य दोघे हे पुन्हा दुबई येथे परत निघून गेले. तर उर्वरित तिघांशी संपर्क सुरू आहे.

तिघांचा शोध सुरू, नातेवाइकांनी तत्काळ संपर्क करावा!
विदेशातून आलेल्या 46 पैकी 43 जणांचा तपास झाला आहे. मात्र तिघांचा अद्याप तपास लागलेला नाही. या तिघांनी वा त्यांच्या नातेवाइकांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.