
: ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस।। या ओळींप्रमाणे महाराष्ट्रातील संतपरंपरेचे वर्णन केले आहे. ‘फुटकं गाडगं’ आणि ‘खराटा’ ही जगावेगळी साधनं वापरून या जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे वैरागी संत गाडगेबाबांनी जनसामान्यांच्या आयुष्यात प्रबोधनाची पताका फडकविली. त्याच वैरागी संताचे वऱ्हाडातील श्री क्षेत्र ऋणमोचन येथील मठ, त्यांनी खोदलेली विहिर आजही जिर्णोध्दाराच्या प्रतीक्षेतच असल्याची खंत संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
अकोला : ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस।। या ओळींप्रमाणे महाराष्ट्रातील संतपरंपरेचे वर्णन केले आहे. ‘फुटकं गाडगं’ आणि ‘खराटा’ ही जगावेगळी साधनं वापरून या जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे वैरागी संत गाडगेबाबांनी जनसामान्यांच्या आयुष्यात प्रबोधनाची पताका फडकविली. त्याच वैरागी संताचे वऱ्हाडातील श्री क्षेत्र ऋणमोचन येथील मठ, त्यांनी खोदलेली विहिर आजही जिर्णोध्दाराच्या प्रतीक्षेतच असल्याची खंत संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
गाडगेबाबांच्या कार्यामुळे त्याचं संतत्व इतरांप्रमाणे केवळ धार्मिक क्षेत्रापुरतं मर्यादित राहत नाही. ते मानवी जीवनाच्या दाही दिशांना स्पर्शून त्याला उजळून काढते. म्हणूनच कुणाला ते संत वाटतात, तर कुणाला महान समाजसुधारक वाटतात. इतर संतांनीही समाजसुधारणा केली आहेच. परंतु, शब्द आणि वाणी याशिवाय दुसरी साधणं त्यांनी क्वचितच वापरली असतील. डेबूजीच्या हातातील ‘फुटकं गाडगं’ आणि ‘खराटा’ ही जगावेगळी साधनं होती. त्या प्रतिकांच्या मागे महान आशय दडलेला होता. आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनातील समतेचा ध्वनी त्यातून आसमंतात निनादतांना ऐकू येतो आणि एका कृतिशील कर्मयोगी जीवनाची त्यातून जुगलबंदी होते. यातून निर्माण होणारे संगीत मोठं प्रभावी आणि प्रेरणादायी ठरते. कुंभकर्णी झोपेत बुडालेल्या अजगरागत सुस्तावलेल्या समाजाला ते जागे करते.
हेही वाचा - ...तर 10 रुपये थाळीचं होईल झुनका भाकर
प्रबोधनकार ते लोककवी लिहितात थोरवी
कर्मयोगी गाडगेबाबांची थोरवी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते लोककवी डॉ.विठ्ठल वाघ यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीतून मांडली. प्रबोधनकार ठाकरे ते लोककवी डॉ.विठ्ठल वाघ यांच्यासह २५-३० चरित्र्ये लिहल्या गेली आहेत. यामध्ये प्राचार्य रा.तु. भगत, केशव बा. वसेकर, गो.नी. दांडेकर, जुगलकिशोर राठी, नारायण वासुदेव गोखले, विजया ब्राम्हणकर, डॉ. द.ता. भोसले, वसंत शिरवाडकर (इंग्रजी), गिरिजा कीर, दिलीप सुरवाडे, मधुकर केचे, डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर, सुबोध मुजुमदार आदींचा समावेश आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीतील निष्ठावंत अस्वस्थ
ठाकरे सरकारकडून अपेक्षा
कर्मयोगी गाडगेबाबांचे चरित्र लिहिण्याचे काम त्यांच्या कार्यकाळातच प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलं होतं. आज प्रबोधनकारांचे नातू उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे गाडगेबाबांचे विचार अभ्यासक्रमातून ते उतरवू शकतात. सोबतच कर्मयोगी बाबांची भूमी श्री क्षेत्र ऋणमोचन येथे त्यांचे स्मारक उभारण्यासाठी ते निधी देऊन त्यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करू शकतात. धर्मार्थ दवाखाना, गरिब विद्यार्थ्यांसाठी होस्टेलसाठी तेथे जागा उपलब्ध आहे. शासकीय स्तरावरून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासोबतच गाडगेबाबांनी स्वतः खोदलेली विहीर, जुनी भांडी आजही आहेत. शासनाकडून ऋणमोचन येथील मठाचा जिर्णोध्दार करण्यासाठी स्थानिक आमदारांकडे सातत्याने पाठपूरावा सुरू असल्याचे संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी सांगितले.