राजपत्रित अधिकाऱ्यांमुळे बच्चू कडूंची बैठक रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

अकोला - तेल्हारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे राजपत्रित अधिकाऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या बैठकीला अनुपस्थित राहत असहकार आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या असहकारामुळे आमदार बच्चू कडू यांना शुक्रवार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक रद्द करावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तेल्हारा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. या वेळी गटविकास अधिकारी फडके यांच्याशी झालेल्या वादावादीनंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासत त्यांना मारहाणसुद्धा केली होती. या प्रकरणी गटविकास अधिकारी फडके यांच्या तक्रारीवरून चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या हल्ल्याप्रकरणी राजपत्रित अधिकारी संघटनेसह जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. या घटनेनंतर आज बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे नियोजन प्रहारच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास राजपत्रित अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ही बैठक रद्द करावी लागली.

Web Title: Bacchu Kadu Meeting Cancel by Office Beating