सोनारवाईत शिरले धरणाचे "बॅक वॉटर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

वेलतूर ः घर, अंगणासह रस्ते व शेतशिवारास धरणाच्या "बॅक वाटर'ने सोनारवाई गावात पुरते घेरले आहे. सर्वत्र पाणीच पाणी आहे. मंगळवारच्या रात्रीपासून पावसाने "रिएन्टी' मारल्याने गावाचा पुन्हा संपर्क तुटण्याची वेळ आली आहे.

वेलतूर ः घर, अंगणासह रस्ते व शेतशिवारास धरणाच्या "बॅक वाटर'ने सोनारवाई गावात पुरते घेरले आहे. सर्वत्र पाणीच पाणी आहे. मंगळवारच्या रात्रीपासून पावसाने "रिएन्टी' मारल्याने गावाचा पुन्हा संपर्क तुटण्याची वेळ आली आहे.
गावाचे पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थ पाण्याच्या विळख्यात जगत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुनर्वसन असा नियम असताना अधिकाऱ्यांनी आपल्या मनमर्जीने पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. ग्रामस्थांनी याला वारंवार विरोध करून न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयानेही त्यांच्याच बाजूने निर्णय देऊन त्यांच्या मागणीनुसार पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. मात्र, अधिकाऱ्यांतील समन्वयाअभावी पुनर्वसन अजूनही रखडले आहे. योग्य पुनर्वसन होऊ न शकल्याचे कटूसत्य आहे. सोनारवाई ग्रामस्थांना धरणाचे पाणी अस्वस्थ करत आहे. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचा पुनर्वसनासाठीचा लढा सुरू आहे. अवघ्या आठ दहा घरांची वस्ती असलेले हे शेतीसमृद्ध गाव आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे.
सोनारवाई गावाचे पुनर्वसन आधी वेलतूर बोथली शिवारात नवेगाव उमरी गावठाणात ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ठरविले होते. ग्रामस्थांनी भविष्यकाळातील रोजगाराचा विचार करत त्याला विरोध करून महामार्गावर व विशेषतः औद्योगिक शहराजवळ त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी अधिकारीवर्गाची मनधरणी केली. पण, ती कामी आली नाही. परिणामी ग्रामस्थ न्यायालयात गेले आणि त्यांचे पुनर्वसनाचे घोंगडे भिजतच राहिले. त्यात एक पिढी गारद झाली असून आता नवी पिढी लढाईसाठी पुढे सरसावल्याने त्यांच्या योग्य पुनर्वसनाच्या मागणीची धार अधिकच तेज झाल्याचे स्पष्ट चित्र आहे.
शासन नियमानुसार आमचे योग्य पुनर्वसन व्हावे. विविध नागरी सुविधा आम्हाला विनाविलंब मिळाव्यात.
- शंकर डहाके
ग्रामस्थ, सोनारवाई
पाणी पावसात येवढं जिनगानीचं साहित्य घेऊन कसं बाहेर पडू?
- सविता बडगे, ग्रामस्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Backwater of dam in Sonarwai