सावधान! बाजारात भेसळयुक्त मिठाई दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

नागपूर : दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक मित्रांना मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू दिल्या जातात. त्यात तयार मिठाईलाही पसंती दिली जाते. पण, ही मिठाई भेसळयुक्त असू शकते. नागपुरात अशी भेसळयुक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ग्राहक पंचायत समितीतर्फे करण्यात आली आहे. 

नागपूर : दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक मित्रांना मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू दिल्या जातात. त्यात तयार मिठाईलाही पसंती दिली जाते. पण, ही मिठाई भेसळयुक्त असू शकते. नागपुरात अशी भेसळयुक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ग्राहक पंचायत समितीतर्फे करण्यात आली आहे. 
दिवाळीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त व बनावट मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दाखल घ्यावी आणि ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना सावध राहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ अध्यक्ष श्‍यामकांत पात्रीकर, संघटक कल्पना उपाध्याय, सचिव लीलाधर लोहरे यांनी केले आहे. बाजारात भेसळयुक्त मिठाईचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: दुधापासून बनविलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते. मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ व रासायनिक पदार्थ वापरून भेसळयुक्त मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे. बनावट खवा बनविणारे परप्रांतीय असल्याचे सांगितले जाते. मिठाई दुकानदार त्यांच्याकडून खवा विकत घेऊन त्याची मिठाई विकतात. प्रशासन विभागाकडूनही उघड्यावरून अन्नाचे नमुने तपासले जात नाहीत. त्यामुळे भेसळयुक्त मिठाईची तपासणी करून कारवाई करण्याकडे हा विभाग तत्परता न दाखविता उदासीनच आहे. त्यामुळे बनावट खवा - मिठाई दुकानदारांचे फावते आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने याची दखल घ्यावी, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष प्रशांत चौधरी, संघटक रेखा भोंगाडे, दिलीप चौधरी, प्रशांत लांजेवार, अर्चना पांडे, छाया खांडेकर, श्रीराम सातपुते, रंजीता चापके, उज्ज्वला शहारे, श्रवणकर, कविता बोबडे यांनी केले आहे. 
तेलकट वाटल्यास भेसळ 
मिठाई वा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वास आला तर भेसळ समजावी. 
मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच तेलकट वाटला तर त्यात भेसळ समजावी 
मिठाई व खव्यावर तीन-चार आयोडीनचे दोन थेंब टाका भेसळ नसल्यास त्यावर काहीही परिणाम होत नाही. भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल. 
मिठाई व खव्यावर हायड्रोक्‍लोरिक ऍसिड टाकल्यास, मिठाईचा रंग जांभळा होतो. 
भेसळयुक्त मिठाईमुळे मळमळ, उलटी व जुलाब सुरू होतात. 
भेसळयुक्त मिठाई शुद्ध खव्यापासून न बनविता अर्ध्या प्रमाणात खवा, त्यात मैदा व अन्य पीठ वापरले जाते. त्यात काही रासायनिक पदार्थही वापरले जातात. त्यामुळे त्यात खव्याप्रमाणे चिकटपणा येऊ शकेल. साखरेचे प्रमाण मात्र बनावट खाव्यात बिघडते. त्यामुळे बनावट मिठाई चविष्ट नसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad sweets Entering the market