बादलचा खून कौटुंबिक वादातूनच

Crime
Crime

नागपूर - रामबाग परिसरातील गुंड बादल गजभिये याच्या खून प्रकरणाचा इमामवाडा पोलिसांनी १२ तासांच्या आत छडा लावला. भावाची पत्नी आणि सासूला मानसिक त्रास देत असल्याने भावाच्या साळ्यानेच अन्य मित्रांच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची बाब समोर आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नीलेश मेश्राम (२२), सन्नी बागडे (२३), उद्देश मेश्राम (२३), आदर्श ऊर्फ एक्‍शन जारोंडे (२०) सर्व रा. रामबाग, मैत्री बुद्धविहाराजवळ आणि रितिक ऊर्फ काल्या खोब्रागडे (१९) रा. चेतना बुद्धविहाराजवळ, रामबाग अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी आणि मृत बादल गजभिये (२८) शेजारीच राहतात. बादलचा धाकटा भाऊ आकाश आणि नीलेशच्या बहिणीचा प्रेमविवाह झाला असून, त्यांना छोटे बाळही आहे. बादलला हे नातेसंबंध खटकत होते. यामुळे तो भावसुनेला त्रास द्यायचा. १० एप्रिलला बादलने नीलेशच्या आईलासुद्धा मारहाण केली होती. यामुळे नीलेश चिडला होता. तर, बादल कधीही सन्नी बागडेची छेड काढायचा. यामुळे तोसुद्धा चिडून होता. त्यांनीच बादलच्या खुनाचा कट रचून अन्य आरोपींना त्यात सहभागी करून घेतले. 

बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास बादलला बैद्यनाथ चौकाजवळ गाठले. डोळ्यात मिरचीपूड भिरकावल्यानंतर तलवारीचे घाव घालत व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. 

यानंतर आरोपी पसार झाले होते. बादलवर हत्येचा प्रयत्न, अपहरण, आर्म्स ॲक्‍टसह आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये त्याच्या वडिलांचाही खून झाला होता. पोलिसही त्याच दिशेने तपास करीत होते.

घटनेच्या वेळी सनी मलखाम नावाचा मित्र बादलसोबत होता. मात्र, हल्ला होताच तो पळून गेला. तोंडाला कापड बांधले असल्याने तो आरोपींना ओळखू शकला नाही. पोलिसांना पहाटे नीलेशसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर तपासचक्रे वेगात फिरवीत इमामवाडा पोलिसांनी पाचही आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. आरोपींनी घटनेची आणि खून करण्यासाठी तळेगाव येथून तलवार आणल्याची कबुली दिली. पत्रकार परिषदेला इमामवाड्याचे पोलिस निरीक्षक मुकुंदा साळुंके उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com