यंदा 'वारकऱ्या'चा मान चिंचपूरच्या 'विठ्ठला'ला, मुख्यमंत्र्यांसह करणार महापूजा

मंगळवार, 30 जून 2020

विठ्ठलावर बडे कुटुंबाची जिवापाड श्रद्धा आहे. ते विठ्ठलभक्तीविषयी एकनिष्ठ आहेत. गेल्या सहा वर्षांपासून एकादशीला आळंदी व वर्षभर पूर्णवेळ ते पंढरपुरात असतात. 'लॉकडाऊन'च्या काळात ते मंदिरात दररोज सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास सेवा देत आहेत.

यवतमाळ : आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात समग्र महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा होते. या महापूजेचा पहिला मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. एक जुलैच्या मध्यरात्री राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही महापूजा सपत्नीक करतील. या महापूजेत 'मानाचे वारकरी' म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर (पांगूळ) येथील विठ्ठल बडे व त्यांची पत्नी सौ. अनसूया बडे या वारकरी दाम्पत्याची निवड झाली आहे. बडे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील विठ्ठलाला मिळालेले हे सौभाग्यच आहे.

महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येत आहे. विठ्ठलभक्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर (पांगूळ) येथील बडे कुटुंबीय हे वारकरी संप्रदायाचे आहेत. विठ्ठल बडे यांच्या कुटुंबात तिसऱ्या पिढीपासून वारीची परंपरा सुरू आहे. पहिल्या पिढीत नामदेव मफाजी बडे, दुसऱ्या पिढीत ज्ञानोबा बडे यांच्यानंतर आता विठ्ठल ज्ञानोबा बडे ही वारीची परंपरा चालवत आहेत. शेतकरी असलेले विठ्ठल बडे यांचे वय आज 81 वर्षे असून ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात गेल्या सहा वर्षांपासून वीणेकरी म्हणून सेवा देत आहेत.

हेही वाचा : चिदानंद रुपम शिवोहम शिवोहम

त्यांची पत्नी सौ. अनसूया बडे यांचे वय 75 आहे. त्या गृहिणी असून वारकरी आहेत. दुसरा वर्ग शिकलेल्या विठ्ठल बडे यांना विठ्ठलभक्तीचा बालपणापासूनच छंद आहे. विठ्ठलभक्ती ही नवनाथ परंपरेचा एक भाग आहे. जवळच असलेल्या गंजेनाथ संस्थानातील हभप वामन भू बाबा हे विठ्ठल बाबांचे सद्गुरू. त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी विठ्ठलभक्तीत स्वत:ला झोकून दिले. ज्ञानेश्‍वरीतील शेकडो ओव्या त्यांना मुखोद्गत आहेत. ज्ञानेश्‍वरीवर त्यांनी हजारो पारायणे केली असतील. ज्ञानेश्‍वरीतील गाथा, संत तुकारामांचे अभंग व हरिपाठ त्यांना पाठ आहे. पूर्वी ते पायदळ वारीत सहभागी होत. ही त्यांची महिन्याची वारी असायची.

अलीकडे बसची सोय झाली तेव्हापासून वारी बसने जाऊ लागली. विठ्ठलावर त्यांची जिवापाड श्रद्धा आहे. ते विठ्ठलभक्तीविषयी एकनिष्ठ आहेत. गेल्या सहा वर्षांपासून एकादशीला आळंदी व वर्षभर पूर्णवेळ ते पंढरपुरात असतात. 'लॉकडाऊन'च्या काळात ते मंदिरात दररोज सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास सेवा देत आहेत. बाहेरील लोकांना मंदिरात सध्या प्रवेश नाही.

एक जुलैच्या मध्यरात्री शासकीय महापूजा अडीचच्या दरम्यान होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक महापूजा करणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व काळजी घेतली आहे. "वारकऱ्यांचे प्रतिनिधी' म्हणून विठ्ठल बडे सपत्नीक पूजेत सहभागी होणार आहेत. त्यांना दोन मुले आहेत. थोरला मुलगा आदिनाथ पुण्यातच व्यवसाय करतो, तर धाकटा मुलगा गोरक्षनाथ पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. ते सुद्धा विठ्ठलभक्तीची परंपरा चालवत आहेत. त्यांच्या चौथ्या पिढीतही ही परंपरा सुरू आहे.

विदर्भाच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

गेल्या सहा वर्षांपासून सेवा

हलाखीच्या परिस्थितीतही त्यांच्या विठ्ठलभक्तीत कधी फरक पडला नाही. त्यांची महिन्याची वारी कधी चुकली नाही. ते दररोज सकाळी चारला उठतात. त्यांचा दिनक्रमच विठ्ठलनामाने सुरू होतो. पंढरपूरच्या मंदिरात गेल्या सहा वर्षांपासून ते विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. एकादशी व द्वादशीचे व्रत ते निष्ठेने करतात.
गोरक्षनाथ बडे, पुणे.