आला 'हंडी'चा महिना... बहिरम यात्रेचा शंखनाद 

स्वप्नील वासनकर 
Monday, 23 December 2019

विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो भाविक अमरावतीत दीड महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी गर्दी करीत असतात. यात्रेसाठी मणेरी लाईन, फुलांची दुकाने, लाह्या-फुटाणे, उपहारगृहे, भोजनालय थाटण्यात आले आहेत. हंडीचे मटण व रोडगे हे बहिरम यात्रेचे वैशिष्ट्य आहे. चांगलीच थंडी पडत असल्याने चुलीवर हंडी ठेवून त्यात मटण शिजविणे व वातावरणाचा आनंद घेण्याची मौज येथे येणारे लुटतात. 

करजगाव (जि. अमरावती) : शाकाहारी आणि मासाहारी असे खाण्याचे दोन प्रकार आहेत. अनेकजण शाकाहारी जेवण करतात. मात्र, मास खाणाऱ्यांचा वर्ग वेगळाच. चिकन, मटण, मच्छी आदी प्रकारचे मास खाण्याकडे त्यांचा कल असतो. यासाठी ते कोणतीही किंमत मोजत असतात. हंडीच्या मटणाची तर बातच वेगळी. खवय्यांसाठी जणू एक पर्वणी ठरणाऱ्या संपूर्ण विदर्भात परिचित असलेल्या बहिरम यात्रेला नुकतीच सुरुवात झाली आहे. हंडीचे मटण तसेच रोडग्यावर ताव मारणाऱ्यांची येथे गर्दी होणार आहे. पहिल्याच रविवारी बहिरमला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. 

विदर्भवासींचे ज्या यात्रेकडे लक्ष लागले असते त्या बहिरम यात्रेला शुक्रवारी (ता. 20) बहिरमबुवाच्या भव्य मूर्तीला शेंदूर, दूध, दही, मध व लोण्याचा अभिषेक करून विधिवत पूजनाने सुरुवात झाली. मंदिरासमोर असलेल्या यज्ञाला पूर्णाहुती देऊन बहिरमबाबाची आरती करण्यात आली. त्यानंतर रोडग्याचा नैवेद्य दाखवून या यात्रेचा नारळ फुटला. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो भाविक येथे दीड महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी गर्दी करीत असतात. यात्रेसाठी मणेरी लाईन, फुलांची दुकाने, लाह्या-फुटाणे, उपहारगृहे, भोजनालय थाटण्यात आले आहेत. 

Image may contain: fire

 

अधिक माहितीसाठी - सोयाबीनला सोन्याचे दिवस, भाव 4 हजार 200 वर

शुक्रवारी सकाळपासून बहिरमबाबाच्या महापुजेला सुरुवात झाली. मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवमंदिर, हनुमान मंदिर, महागणपती मंदिर याठिकाणी अभिषेक करण्यात आला. होमहवन, नैवेद्य दाखवल्यानंतर शंखनाद करून बहिरम यात्रेचा श्रीगणेशा झाला. या संपूर्ण सोहळ्याला संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी, भास्कर मानकर, सुरेश ठाकरे, डॉ. प्रेम चौधरी, किशोर ठाकरे, विठूजी चिलोटे, प्रकाश ठाकरे, डॉ. राजेश उभाड, अनिल कडू, अमर चौधरी व समस्त विश्‍वस्त मंडळ उपस्थित होते. या सोहळ्याला सुनील ठाकरे, पिंटू ठाकरे यांचे सहकार्य लाभले. 

हेही वाचा - कमालंच की, मटणानंतर आता बोकडाच्या चामड्यासाठी आंदोलन

हंडीचे मटण व रोडगे

हंडीचे मटण व रोडगे हे बहिरम यात्रेचे वैशिष्ट्य आहे. अनेक जण येथे पाल टाकून राहतात. हंडी तसेच मटण येथेच उपलब्ध होते. यात्रेत लागणारी विविध स्वरुपाच्या दुकानांमध्ये खरेदी करण्याचा आनंदसुद्धा अनेक जण घेतात. आता चांगलीच थंडी पडत असल्याने चुलीवर हंडी ठेवून त्यात मटण शिजविणे व वातावरणाचा आनंद घेण्याची मौज येथे येणारे लुटतात. 

Image may contain: one or more people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahiram Yatra begins in Amravati